अन्न व औषध प्रशासनाचा नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईचा बडगा
तळोदा, नवापूर, शहादा तालुक्यात कारवाई; दोघांचे परवाने रद्द, एक निलंबित तर एकावर गुन्हा दाखल

नंदुरबार, दि. २० : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यात अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत तळोदा येथील एका अन्न विक्री पेढीचा परवाना रद्द करण्यात आला असून, नवापूर येथील चिकन बिर्याणी सेंटरचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच शहादा तालुक्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे पाटील यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
तळोद्यात मुदतबाह्य उत्पादने आढळली
तळोदा येथील एका अन्न विक्री पेढीची अचानक तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळून आली. तसेच मुदत संपलेली उत्पादने विक्रीसाठी ठेवल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित पेढीचा परवाना तात्काळ रद्द करण्यात आला.
नवापूरमधील बिर्याणी सेंटरवर कारवाई
नवापूर शहरातील कचेरी रोड परिसरातील एका चिकन बिर्याणी सेंटरची तपासणी केली असता अन्नपदार्थ अत्यंत अस्वच्छ व असुरक्षित वातावरणात तयार केले जात असल्याचे आढळले. या गंभीर त्रुटींमुळे संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
वडाळीत गुटख्याचा साठा; गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील वडाळी येथील ‘मामाजी ट्रेडर्स’ येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पानमसाल्याचा साठा विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित आस्थापनेची नोंदणी रद्द करण्यात आली असून, संबंधितांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘जनतेच्या आरोग्याशी खेळ सहन केला जाणार नाही’
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंढे (भा.प्र.से.) यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. भेसळ अथवा गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा मानके व नियमांचे काटेकोर पालन करून स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात व्यवसाय करावा. तसेच कोणत्याही अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत नागरिकांना शंका असल्यास त्यांनी स्वतःचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता देऊन अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे पाटील यांनी केले आहे.
- 0
- 0
- 0
- 0





