अनिष्ट रूढींना मूठमाती देऊन आदर्श परंपरांचा सन्मान राखावा-
माजी आ. शिरीष चौधरी

नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरांचा पुनर्विचार करून काळानुसार त्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे गरजेचे आहे. जुन्या परंपरांमधील चांगल्या गोष्टी जपत समाजहिताला बाधक असलेल्या प्रथा बंद करून नव्या विचारांचा स्वीकार करावा. असे प्रतिपादन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले.

नंदुरबार येथील तैलिक समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिरीष चौधरी बोलत होते.
शहराच्या मध्यवर्ती भागातील तैलिक मंगल कार्यालयात बैठक संपन्न झाली.
दरम्यान तेली समाजाचे ज्येष्ठ नेते ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल मनोज जरांगे यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा नंदुरबार तेली समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

सामाजिक मंथन झालेल्या या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सर्वानुमते ठराव पारित करण्यात आले.
यात प्रामुख्याने
साखरपुडा पध्दत बंद करावी, साखरपुडा करणाऱ्या कुटुंबास दंडात्मक स्वरूप देण्याचे ठरले. याशिवाय लग्न सोहळ्यात प्रिवेडींग शुटींग प्रसारीत करु नये,
अंत्यविधीच्या दिवशी मुंडन देणारे व्यक्ती यांनी प्रेतयात्रे अगोदर घरीच मुंडन करावे,अस्थी विसर्जन पवित्र नदीत तसेच शेतात किंवा परीसरात खड्डा करुन तेथे वृक्षारोपण करावे जेणेकरून मृतव्यक्तींच्या स्मृती जपल्या जातील,असे आवाहन माजी आमदार व नंदुरबार तेली समाजाचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी उपस्थित तेली समाज पदाधिकारी व बंधू – भगिनी यांच्याशी विचार विनिमय करुन अंतिम निर्णय घेतला.
नंदुरबार तेली समाजाची सर्वसाधारण सभा तेली समाजाचे अध्यक्ष तथा माजी आ. शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेचे सचिव प्रकाश छगन चौधरी यांनी सभेतील विषयांचे वाचन करून ते सभेसमोर मांडले. यावेळी अध्यक्ष, पदाधिकारी तसेच उपस्थित समाजबंधू-भगिनींनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.सभेत मागील सर्वसाधारण सभेचे प्रोसीडिंग वाचून दाखविण्यात आले. तसेच समाजाच्या झालेल्या जमा-खर्चाचा आणि आगामी काळातील अपेक्षित खर्चाचा हिशोब सभेसमोर सादर करण्यात आला. त्यावर सविस्तर चर्चा करून हिशोबास मंजुरी देण्यात आली.

यावेळी समाजाचे उपाध्यक्ष सुभाष पुरुषोत्तम चौधरी यांनी समाजाच्या अस्तित्वात असलेले मंगल कार्यालयातील सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत तसेच भविष्यातील विकासकामांचा व नवीन मॅरेज लॅान्स नियोजन आराखडा सभेसमोर मांडला. यावर उपस्थितांनी सकारात्मक चर्चा करून आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत निर्णय घेतला.
नंदुरबार नगर परिषद निवडणुकीत निवडून आलेले उपनगराध्यक्ष प्रथमेश शिरीष चौधरी, नगरसेविका सौ. रेखा भरत चौधरी व नगरसेवक ॲड.गौरव नरेंद्र चौधरी, नगरसेवक गौरव प्रकाश चौधरी यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच निवडून आलेल्या मात्र सभेस उपस्थित राहू न शकलेल्या नगरसेवकांचाही समाजाच्या वतीने शब्दसुमनांनी गौरव करण्यात आला.
समाजातील अनिष्ट चालीरीतींना आळा घालणे, समाजात एकोपा व सामाजिक बांधिलकी वाढविणे तसेच समाजाला प्रगतीच्या योग्य दिशेने घेऊन जाण्यासंदर्भात सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. समाज हितासाठी सकारात्मक निर्णय घेत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती-पुण्यतिथी,समाजभूषण हिरालालकाका चौधरी यांच्या स्मरणार्थ विद्यार्थी गुणगौरव सोहळा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर यासारखे अनेक समाजाभिमुख विविध उपक्रम राबविण्याते सातत्य कायम असावे असे यावेळी ठरविण्यात आले.
सभेस कार्याध्यक्ष ईश्वर जयराम चौधरी, उपाध्यक्ष सुभाष पुरुषोत्तम चौधरी, सचिव प्रकाश छगन चौधरी,संदीप ओंकार चौधरी, सौ.उमा प्रकाश चौधरी, यांच्यासह सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी तसेच समाजबंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- 0
- 0
- 0
- 0






