Politics नाशिक

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात नऊ जणांचे १४ उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात नऊ जणांचे १४ उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

नाशिक, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नऊ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले. या उमेदवारी अर्जांची मंगळवार २ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छाननी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहनिवडणूक निर्णय अधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. एकूण ९ जणांचे १४ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची मंगळवार २ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छाननी करण्यात येईल. ४ जून २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निरीक्षक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी मिलिंद शंभरकर यांची नियुक्त केली असून त्यांचे नाशिक येथे आगमन झाले आहे. ते भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणार आहेत.
या निवडणुकीसाठी एकूण ६२२ मतदार असून मतदान मतपत्रिकेवर होणार आहे. मतदारांना मत पत्रिकेवर आपला प्राधान्य क्रम नोंदवायचा आहे. त्यासाठी संबंधित मतदारांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *