जळगाव

फुले कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत जळगावात ‘केळी दिवस व शिवार फेरी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

फुले कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत जळगावात ‘केळी दिवस व शिवार फेरी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा)– : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे फुले कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत ‘केळी दिवस व शिवार फेरी’ कार्यक्रम मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्वे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या सुरवातीस शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी केळीवरील सुरू असलेल्या विविध संशोधन प्रयोगांची पाहणी करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून तांत्रिक माहिती देण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. अरुण भोसले, उद्यानविद्यावेत्ता, केळी संशोधन केंद्र, जळगाव यांनी केळीवरील संशोधन प्रयोग, देशी वाण, खत व्यवस्थापन व रोग व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.
कार्यक्रमात डॉ. उल्हास सुर्वे यांनी जमीन आरोग्य व्यवस्थापनावर, डॉ. सुनील कदम यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ड्रोन तंत्रज्ञानावर, डॉ. विक्रम कड यांनी केळी प्रक्रिया व उत्पादने, तर डॉ. के. बी. पाटील (जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव) यांनी निर्यातक्षम केळी लागवडीतील आव्हाने व उपाय यावर मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. कुरबान तडवी यांनी जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाची सद्यस्थिती व निर्यात आकडेवारी विषयी माहिती दिली.
तांत्रिक सत्रामध्ये केळी पिकातील भविष्यातील आव्हाने व संधी, निर्यातक्षम उत्पादन, पनामा रोग व्यवस्थापन, केळी प्रक्रिया उद्योग तसेच केळी उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापर यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आधुनिक केळी लागवड घडीपत्रिका व संशोधन पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले तसेच आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सेंद्रीय व निर्यातदार शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास डॉ. गोरक्ष ससाणे (संचालक, विस्तार शिक्षण), डॉ. बी. एम. इल्ले, डॉ. यु. बी. हुले, डॉ. संदीप पाटील, डॉ. दिपक दहाट, डॉ. हेमंत बाहेती, डॉ. योगेश्वर पाटील तसेच केळी शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष श्री. संदिप पाटील व उपाध्यक्ष श्री. विनोद बोरसे यांच्यासह राज्यभरातून सुमारे ४०० केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *