आंतरराष्ट्रीय खान्देश जळगाव धुळे नंदुरबार

गुजरातमधील सोनगड येथे अहिराणी भाषेचा जागर १ ले अहिराणी कवी संमेलन : खान्देश साहित्य संघाच्या पुढाकार

गुजरातमधील सोनगड येथे अहिराणी भाषेचा जागर

१ ले अहिराणी कवी संमेलन : खान्देश साहित्य संघाच्या पुढाकार

 सोनगड /तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- खान्देश साहित्य संघ, धुळे प्रेरित तापी जिल्हा साहित्य संघाच्या तालुका शाखा सोनगड यांच्या वतीने गुजरात राज्यातील सोनगड येथील रंग उपवन सभागृहात १ ले अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. अहिराणी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धनाचा जागर घडवून आणणाऱ्या या संमेलनाला महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या तीन राज्यांतील ५०० हून अधिक अहिराणी भाषकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. दरम्यान या अहिराणी कवी संमेलनाला गुजरात सरकारचे युवक कल्याण, क्रीडा व नागरी उड्डयण राज्यमंत्री जयराम गावित यांनी उपस्थिती राहून शुभेच्छा दिल्या.


संमेलनाच्या अध्यक्षस्थानी खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी होते. सोनगड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सारिका पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर ज्येष्ठ साहित्यिक शाहीर नानाभाऊ पाटील,केंद्रीय सचिव रमेश बोरसे,तापी जिल्हाध्यक्ष अर्चना चव्हाण,सोनगढ तालुकाध्यक्ष घनश्याम अहिरराव,गिरीश ठाकरे, निलेश चंद्रात्रे,प्रकाश पाटोळे, गोकुळ पाटील,विश्वास देसले,डॉ.लेंडे,सतीश पाटील,शरद धनगर, जयपालसिंग शिंदे,हंसराज महाले,आदी मान्यवर उपस्थित होते.


उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष सारिका पाटील यांनी अहिराणी कवी संमेलनाच्या आयोजनाचे स्वागत करून संमेलनाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात अहिराणी भाषेचा प्रचार व प्रसार वाढविण्यासाठी आगामी काळातही आवश्यक ते सहकार्य केले जाईल,अशी ग्वाही त्यांनी दिली.
अध्यक्षीय बीजभाषणात डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी अहिराणी भाषेचा उगम, इतिहास, वाटचाल, विकास, सद्यस्थिती आणि भविष्यवेध यावर सविस्तर भाष्य केले. अहिराणी भाषेचा डंका आज जगभर वाजत असून, या भाषेने मराठी भाषेला समृद्ध करण्याचे मोठे कार्य केले आहे. मात्र, अहिराणी भाषेला शासनदरबारी मान्यता मिळविण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.अहिराणी भाषेतील अनुवादित कवितांना मराठीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये स्थान दिले जाते; मात्र मूळ अहिराणी कविता, गीते आणि साहित्याला अपेक्षित स्थान मिळत नाही. त्यामुळे मूळ अहिराणी कवी व गीतकार दुर्लक्षित राहात असल्याची खंत व्यक्त करत अहिराणीच्या अस्सल साहित्याला योग्य व्यासपीठ आणि शासनमान्यता मिळणे गरजेचे असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी नमूद केले.
सूत्रसंचालन मुकेश कापुरे, प्रा. सुनील पिंपळे,विजया पाटील, सरला साळुंखे,डॉ. विजय बेडसे यांनी केले. यशस्वीतेसाठी संत श्री ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

अहिराणी काव्यातून सामाजिक वास्तवावर भाष्य :
चार सत्रांत पार पडलेल्या या कवी संमेलनात ४० कवींनी अहिराणी भाषेत आपल्या कविता सादर केल्या. कवींनी आपल्या कवितांमधून अहिराणी भाषेचे महत्त्व, वैभव आणि गौरव अधोरेखित करण्यासोबतच समाजातील अज्ञान, गरिबी, दारिद्र्य, शोषण, व्यसनाधीनता, भ्रष्टाचार तसेच सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचे होत असलेले अधःपतन अशा विविध ज्वलंत विषयांवर भाष्य केले.कवितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत उपस्थितांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न कवींनी केला. कविता ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील वास्तव, वेदना आणि प्रश्न मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे, असा संदेश या कवी संमेलनातून देण्यात आला.

ठरावाद्वारे शासनदरबारी विविध मागण्या :
अहिराणी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अहिराणी भाषेचा संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील भाषांच्या यादीत समावेश करण्यात यावा, अहिराणी भाषेतील साहित्याचा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात यावा, तसेच अहिराणी व गुजराती यांसारख्या बोलीभाषांच्या संवर्धनासाठी गुजरात राज्याला लागून असलेल्या सीमावर्ती भागात अहिराणी भाषा संवर्धन भवनाची निर्मिती करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे ठराव संमेलनात मंजूर करण्यात आले.हे ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात सुमारे पाच लाखांहून अधिक अहिराणी भाषिक नागरिक असून, या भागातील अहिराणी भाषेचा वारसा जपण्याबरोबरच तिचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे, या उद्देशाने सोनगड येथे या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *