अन्न सुरक्षा व संतुलित आहार विषयावर तळोदा तालुक्यातील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन सभा नेमसुशिल विद्यामंदिर येथे संपन्न

तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ, पौष्टिक आणि संतुलित आहार मिळावा तसेच शालेय स्तरावर अन्न सुरक्षेबाबत आवश्यक जनजागृती व्हावी, या उद्देशाने नेमसुशिल विद्यामंदिर, तळोदा येथे तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना अन्न सुरक्षा व संतुलित आहार विषयक मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले.

अन्न सुरक्षा व मानके विनियम 2020 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या सभेत अन्न सुरक्षा प्रशासन आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा व प्रशासन अधिकारी सपना गोडसे, अन्न सुरक्षा अधिकारी संकेत सदाफुले, तळोदा गटशिक्षणाधिकारी पल्लवी सूर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी शेखर धनगर, वसंत जाधव, ज्ञानेश्वर केदार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नरोत्तम मराठे, सर्व सन्माननीय केंद्र प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त अन्न व सुरक्षा सपना गोडसे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांमध्ये सुरक्षित आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व स्पष्ट केले. शालेय परिसरात अन्न सुरक्षा विषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराच्या सवयी निर्माण करण्यासाठी शाळा, शिक्षक आणि संबंधित घटकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. अन्न सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये जनजागृती करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
अन्न सुरक्षा अधिकारी संकेत सदाफुले यांनी अन्न सुरक्षा विषयक नियम आणि शाळांनी घ्यावयाच्या आवश्यक काळजीबाबत माहिती दिली.
शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी पल्लवी सूर्यवंशी, यांनीही शाळांमध्ये अन्न सुरक्षा विषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बागुल, नेमसुशिल माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, तळोदा येथील प्राचार्य सुनील परदेशी तसेच श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिर, तळोदा येथील मुख्याध्यापक गणेश बेलेकर यांनी उपस्थित मान्यवरांचा नेमसुशिल विद्यामंदिराच्या वतीने सन्मान केला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी विद्यालयात उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेच्या वतीने नेमसुशिल शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष निखीलभाई तुरखीया, संचालिका सोनाबेन तुरखीया, उपाध्यक्ष दगेसिंग महाले, सचिव संजयभाई पटेल आणि संस्था समन्वयक हर्षिलभाई तुरखीया यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता हा शिक्षण प्रक्रियेचा अविभाज्य भाग असून, अशा मार्गदर्शनपर उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक आणि पालकांमध्येही अन्न सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
- 0
- 1
- 0
- 0





