
जिल्हा क्रीडा हॉकी प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षणार्थींना मोफत क्रीडा साहित्य वाटप
नंदुरबार |सप्त नगरी न्युज
जिल्हा क्रीडा हॉकी प्रशिक्षण केंद्राच्या वतीने प्रशिक्षणार्थी खेळाडूंना मोफत क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. मा. जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात हॉकी स्टिक, हॉकी बॉल, गोलकीपर किट तसेच स्पोर्ट्स शूज आदी क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी मा. सुनंदा पाटील यांनी राज्यस्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या मुलींच्या संघाचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या मुला-मुलींच्या संघातील दहा राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील खेळाडू सातत्यपूर्ण मेहनत आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळे उल्लेखनीय कामगिरी करत असून, याबद्दल त्यांनी समाधान आणि अभिमान व्यक्त केला.

नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाधिक शाळांनी आपल्या विद्यार्थी-खेळाडूंना जिल्हा क्रीडा हॉकी प्रशिक्षण केंद्रामध्ये सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जिल्हा क्रीडा हॉकी प्रशिक्षण केंद्र हे जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार तसेच शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळा, नंदुरबार या दोन्ही ठिकाणी कार्यरत असून, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथे नियमित प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
क्रीडा साहित्य वाटप कार्यक्रमास तालुका क्रीडा अधिकारी श्री. महेश पाटील, क्रीडा अधिकारी श्री. ओंकार जाधव, श्री. संजय बेलोरकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. भगवान पवार तसेच क्रीडा कार्यालयाचे श्री. मुकेश बारी, श्री. कल्पेश बोरसे, श्री. दिगंबर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
(Collector Office Nandurbar)
sports #YouthInSports #SportsForAll #HockeyIndia #WomenInSports
- 0
- 0
- 0
- 0





