दिवाळीपूर्वी शासन निर्णय न झाल्यास ५० हजार आदिवासी शेतकऱ्यांसह मुंबईकडे कूच!
लोकसंघर्ष मोर्चाचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना इशारा; विविध मागण्यांचे निवेदन सादर

अक्कलकुवा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- आदिवासी, वनहक्कधारक शेतकरी, महिला आणि वंचित घटकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अक्कलकुवा येथे निवेदन सादर करण्यात आले. दिवाळीपूर्वी मागण्यांबाबतचे शासन निर्णय निर्गमित न झाल्यास किमान ५० हजार आदिवासी शेतकऱ्यांसह मुंबईकडे कूच करण्याचा इशारा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला.
लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने १२ ऑक्टोबर २०२६ पासून हजारो आदिवासींच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाची शासनाने दखल घेतली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. यापूर्वी १७ ऑक्टोबर रोजी मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, उईके आणि नरहरी झिरवाळ यांनी जळगाव येथील आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिले होते.
याबाबत निवेदनात प्रमुख मागण्यात पात्र मंजूर व प्रलंबित वनहक्क दावेदारांना दुष्काळी मदतीचा लाभ मिळावा.
सरदार सरोवर प्रकल्पाशी संबंधित वनजमिनींच्या प्रश्नावर पात्र आदिवासी दावेदारांना न्याय मिळावा.
प्रलंबित व अपात्र वनहक्क दाव्यांची कायदेशीर तरतुदींनुसार पुनर्पडताळणी करावी.
वनहक्कधारकांना सहकारी संस्थांचे सभासदत्व मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात.
ई-केवायसीअभावी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र महिलांना पुन्हा संधी द्यावी.
वनजमीनधारक शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदणीतील अडचणी दूर करून विशेष शिबिरे आयोजित करावीत.
दोन वर्षांनंतर जन्मनोंदणी करून जन्मदाखला मिळविण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया आवश्यक असलेल्या आदिवासी नागरिकांना मोफत विधी सहाय्य द्यावे.
शासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष शासन निर्णय होणे आवश्यक असल्याची भूमिका मोर्चाने मांडली. दिवाळीपूर्वी निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी अक्कलकुवा तालुक्यातील विविध गावांचे प्रतिनिधी, काथाभाऊ वसावे, अशोक पाडवी, विरसिंग वसावे, देवीसिंग वसावे, दिवाल्या राऊत, इनेश वसावे तसेच तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत ठाकरे यांच्यासह लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- 0
- 0
- 0
- 0





