
तळोदा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी समिती जाहीर अध्यक्षपदी सिद्धार्थ नरभवर यांची निवड
तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो
तळोदा येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त शहरात जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी एकमताने समितीची निवड करण्यात आली.
सदर या बैठकीत शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीत अध्यक्षपदी सिद्धार्थ नरभवर यांची एकमताने निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी दिनेश ब्राम्हणे, सचिवपदी संघप्रिय नरभवर, सहसचिवपदी देवेंद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खजिनदारपदी संदीप जावरे, सहखजिनदारपदी शरद सावळे यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय समितीच्या सल्लागारपदी प्रा. मुकेश कापुरे, सुभाष शिंदे, संतोष केदार, हंसराज महाले, राजेश नरभवर, अनिल पवार, सुरेश रामराजे, राकेश सावळे, सुनील खैरनार, कपिल खैरनार, पारस जावरे, राहुल बर्डे, भरत पानपाटील, राहुल ब्राह्मणे, रोहित अहिरे, संदीप सामुद्रे, महेंद्र सामुद्रे, आनंद शिंदे आदींची निवड करण्यात आली आहे.
यंदा जयंती उत्सव अधिक व्यापक आणि समाजाभिमुख पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे. सकाळी शहरातील स्मारक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात येणार आहे. यानंतर प्रमुख मान्यवर महामानवाच्या कार्याला उजाळा देतील.सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तसेच ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून समाजात समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात येणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या विचारांचा अंगीकार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
समितीच्या वतीने जयंती उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी तयारी जोरात सुरू आहे.
- 0
- 0
- 0
- 0





