
अवैध वाहतूक करतांना सागवानी लाकडासह पिकअप वाहान जप्त…
अक्राणी व बिलगांव वन कर्मचाऱ्यांच्या पथकाची कारवाई….

धडगाव |सप्त नगरी न्यूज ब्युरो
राजबर्डी-धडगाव रस्त्याने अक्राणी व बिलगाव रेंज स्टाफसह संयुक्तपणे रात्रीची गस्त करीत असतांना पहाटे ४ वाजता महिंद्रा कंपनीची पांढ-या रंगाची मॅक्स पिकअप क्रमांक एम.एच. ०४ बी. यु. ४७६५ वाहन सुमारे २ लाख ६० हजार रुपये या वाहनात साग दांड्या ३० नग १.१०२ घन मीटर माल २४ हजार ५३६ रुपये किंमतीचा माल असा वाहनासह एकुण २ लाख ८४ हजार ५३६ रुपये किंमतीचा मुद्देमाल अवैध वाहतूक करुन धडगावकडे येत असताना शेलकुई गावाजवळ मिळून आला.

सदर मुद्देमालासह वाहन सोडून वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. शोध घेतला असता मिळून आला नाही. वनकर्मचारी यांनी पहाटे धडगाव टिंबर डेपोवर आणून वाहन व मुद्देमाल पावतीने जमा केला. सदर गुन्हयाबाबत रोहिदास पावरा (वनरक्षक राजबर्डी )यांनी त्यांच्याकडील वनगुन्हा क्रमांक ०२/२०२६भा. व.अ. १९२७ चे कलम ४१(१) व ४१(ब) चे उल्लंघन व भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ५२(१)नोंदविला. सदर गुन्हेकामी योग्य ती कागदपत्रे तयार केली.

सदर कारवाई वनसंरक्षक धुळे (प्रा.) श्रीमती निनु सोमराज, संतोष सस्ते उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार, विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे राजेंद्र सदगीर, अक्राणी सहाय्यक वनसंरक्षक (रो. ह. यो.) संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली व अक्राणी वनक्षेत्रपाल (प्रादेशिक) श्रीमती चारुशीला काटे यांच्या व बिलगाव वनक्षेत्रपाल (प्रादेशिक) लक्ष्मीकांत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली धडगाव वनपाल दिलीप पाटोळे, भुषा वनपाल भरतसिंग परदेशी, वनरक्षक मंगेश वळवी, अशोक पावरा, पवन पाडवी, रोहिदास पावरा, दिलवरसिंग पावरा, गिरधर पावरा, दिनेश वसावे, वाहन चालक हेमंत पावरा यांनी केली. पुढील तपास धडगाव वनपाल दिलीप पाटोळे हे करीत आहेत.
- 0
- 0
- 0
- 0





