
तळोदा नगरपरिषदअंतर्गत अपूर्ण विकासकामे विहित मुदतीत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे नगराध्यक्षांच्या सूचना
तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो
तळोदा नगरपरिषद क्षेत्रांतर्गत सुरू असलेली विविध विकासकामे जलदगतीने आणि उच्च दर्जा राखून पूर्ण करण्याच्या सूचना लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. भाग्यश्री चौधरी यांनी दिल्यात
एका विशेष बैठक दि .२३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:०० वाजता नगरपरिषद कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. सदर बैठक तळोदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस नगराध्यक्षांसह, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, विविध प्रभागांचे नगरसेवक आणि संबंधित कामांचे सर्व मक्तेदार (कॉन्ट्रॅक्टर्स) उपस्थित होते.
बैठकीत नगराध्यक्षा सौ. भाग्यश्री चौधरी यांनी शहरातील प्रलंबित आणि अपूर्ण असलेल्या रस्ते, गटारी आणि इतर नागरी सुविधांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
मक्तेदारांना कडक सूचना करत कामात होत असलेल्या विलंबाबद्दल नगराध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. सर्व मक्तेदारांना ही कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.
गुणवत्तेबाबत तडजोड नाही. विकासकामे करताना साहित्याचा दर्जा आणि कामाची गुणवत्ता उत्तम असावी, यात कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही, असेही यावेळी बजावण्यात आले.
कामात येणारे तांत्रिक अडथळे त्वरित दूर करून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याच्या सूचना मुख्याधिकारी व संबंधित विभागाला देण्यात आल्या.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी ही कामे लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असून, हलगर्जीपणा करणाऱ्या मक्तेदारांवर नियमानुसार कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
- 0
- 0
- 0
- 0





