
119 स्टॉल्समधून उमलले बालविश्वासाचे स्वप्न
आदर्श मराठी विद्यामंदिरात बाल आनंद मेळावा दिमाखात संपन्न

नंदुरबार | सप्त नगरी न्युज ब्युरो
येथील आदर्श मराठी विद्यामंदिर या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन आयोजित करण्यात आलेला बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यात उपक्रमशीलता, आत्मविश्वास, व्यवहारज्ञान तसेच संघभावना विकसित करणे या उद्देशाने शाळेच्या अंतर्गत आवारात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी भदाणे होत्या, तर कार्यक्रमाचे उद्घाटन भगवान कोळपे साहेब (अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह वेतन पथक, प्राथमिक नंदुरबार) यांच्या शुभहस्ते पार पडले.कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत आकर्षक व आनंददायी वातावरणात झाली. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी बँड-बाजा तालावर तरतरीत पथक सादर करत पाहुण्यांचे भव्य स्वागत केले. तसेच कब–बुलबुल विभागाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाला उत्साही सुरुवात केली.

या स्वागत संचलनाचे नियोजन व मार्गदर्शन सतीश पाटील सर यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करून घेतले.यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचा परिचय व सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ. मिनाक्षी भदाणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच जीवनोपयोगी कौशल्ये, आर्थिक साक्षरता व आत्मनिर्भरतेसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले. अनुभवातून शिकण्याची संधी देणारे उपक्रमच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देतात, असे त्यांनी नमूद केले.यानंतर मान्यवरांच्या हस्ते एकूण 119 स्टॉल्सचे उद्घाटन करण्यात आले.

या बाल आनंद मेळाव्यात इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आकर्षक व शिस्तबद्ध पद्धतीने साकारले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः पदार्थ तयार करणे, विक्री करणे, दर ठरवणे व आर्थिक व्यवहार हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, आत्मविश्वास व जबाबदारीची भावना विकसित झाल्याचे दिसून आले. बाल आनंद मेळाव्याला सामाजिक जाणिवेचीही जोड लाभली. कब–बुलबुल पथकाच्या ‘खरी कमाई’ उपक्रमांतर्गत शाळेसाठी आर्थिक योगदान देण्यात आले. या अंतर्गत योगेश चौधरी यांनी शाळेला रुपये २,०००/- (दोन हजार रुपये) भेट दिली. तसेच या मेळाव्याच्या निमित्ताने पालक व विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे खरी कमाई अंतर्गत स्वरूपात शाळेस आर्थिक भेट दिली. शाळेप्रती असलेली आपुलकी, विश्वास व सहकार्य याचे हे सुंदर उदाहरण ठरले.

या वेळी प्रा. युवराज पाटील, पुनम गिरी मॅडम तसेच श्री. भद्रेश त्रिवेदी (मुख्याध्यापक, गुजराती विभाग) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रोवली जातात, असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हरीश चौधरी यांनी प्रभावीपणे केले. अतिथी परिचय श्री. तुषार सोनवणे यांनी करून दिला. कार्यक्रमाची सांगता अशोक सोनार यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
या बाल आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, व्यवहारज्ञान, संघभावना, सर्जनशीलता व नेतृत्वगुण विकसित झाले, असे मत उपस्थित मान्यवर, शिक्षक व पालकांनी व्यक्त केले. आदर्श मराठी विद्यामंदिरचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित शिक्षणाचा एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
- 0
- 0
- 0
- 0





