नंदुरबार

अक्कलकुवा पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट इशारा

अक्कलकुवा पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट इशारा

अक्कलकुवा |सप्त नगरी न्यूज ब्युरो

तालुक्यातील पंचायत समिती अक्कलकुवा कार्यालयाचा संपूर्ण परिसर तसेच कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या मागील भागात भीषण अस्वच्छता निर्माण झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासकीय कामकाजाचे केंद्र असलेल्या या ठिकाणीच सर्वत्र प्लास्टिक कचरा, सुकलेले गवत, वाढलेली झुडपे आणि कचऱ्याचे ढीग पसरलेले दिसून येत आहेत. काही ठिकाणी कचरा जाळल्याचेही स्पष्ट चिन्ह दिसून येत असून त्यामुळे पर्यावरणीय हानीसोबतच आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पंचायत समितीच्या मुख्य इमारतीच्या आजूबाजूला तसेच मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर घाण साचलेली आहे. विशेषतः कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या मागील भागातही अशीच परिस्थिती असून तेथील जागा जणू कचरा टाकण्याचे ठिकाण बनली आहे. यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी, डास व इतर घातक कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या स्वतःच्या कार्यालय परिसरातच अशी अस्वच्छता दिसून येणे ही अत्यंत लज्जास्पद बाब मानली जात आहे. प्रशासनाने स्वतःच्या आवारात स्वच्छता राखण्यात अपयश आले असल्याचे या परिस्थितीतून स्पष्ट दिसून येते. नियमित साफसफाईसाठी नियुक्त कर्मचारी असूनही अशी अवस्था का निर्माण झाली, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे या प्रकरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा उघडपणे समोर येत असल्याची टीका होत आहे.
दरम्यान, या गंभीर बाबीची दखल घेत युवा क्रांती नंदुरबार या सामाजिक संघटनेच्या वतीने मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती अक्कलकुवा यांना तीव्र शब्दांत निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट बोट ठेवत तात्काळ संपूर्ण परिसराची साफसफाई करावी, साचलेला कचरा हटवून योग्य कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करावी, तसेच निष्काळजी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच, येत्या तीन दिवसांच्या आत आवश्यक ती कारवाई न झाल्यास पंचायत समिती आवारातच आगळीवेगळी स्वच्छता मोहीम राबवून शासनाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात येईल, असा स्पष्ट इशारा युवा क्रांती नंदुरबारच्या वतीने देण्यात आला आहे. या इशाऱ्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून आता ते कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर निवेदन देताना युवा क्रांती नंदुरबारचे जिल्हा उपप्रमुख डॉ. पंकज तडवी, तालुकाध्यक्ष धिरसिंग वसावे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी परिसराची पाहणी करून प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
एकूणच, पंचायत समिती अक्कलकुवा परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न आता केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित राहिलेला नसून तो प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला आहे. स्वच्छतेचे धडे देणाऱ्या यंत्रणेनेच स्वतःच्या परिसरात स्वच्छता राखण्यात अपयश आले असल्याने या प्रकरणी तात्काळ व ठोस कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी सर्व स्तरांतून जोर धरत आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *