नंदुरबार नाशिक महाराष्ट्र

महिलांचे शोषण करणाऱ्या खरातावर कठोर कारवाई करानंदुरबार अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

महिलांचे शोषण करणाऱ्या खरातावर कठोर कारवाई करा नंदुरबार अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

नंदुरबार / सप्त नगरी न्यूज ब्युरो

नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे शोषण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन निवासी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अशोक खरात प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्यापुरते मर्यादित नसून त्यामागे बुवाबाजी, अंधश्रद्धा, सत्ता आणि लैंगिक शोषण यांचे गंभीर जाळे असल्याची शक्यता आहे. समाजातील भीती, असुरक्षितता आणि अडचणींचा गैरफायदा घेत तथाकथित अध्यात्म, ज्योतिष आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे व सर्वसामान्यांचे शोषण होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून (SIT) निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, तसेच संबंधित सर्व दोषींवर कोणताही दबाव न मानता कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम, २०१३” या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचीही मागणी करण्यात आली.

तसेच फलज्योतिषाच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करून फसवणूक होत असल्याने त्याचाही कायद्यात समावेश करून नियंत्रण आणावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पीडित महिलांचे संरक्षण, त्यांची ओळख गोपनीय ठेवणे, त्यांना कायदेशीर व मानसोपचार मदत उपलब्ध करून देणे तसेच साक्षीदारांना सुरक्षा देणे आवश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

याशिवाय आरोपीचे राजकीय व प्रशासकीय संबंध उघड करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच राज्यभर अशा भोंदूगिरीच्या प्रकरणांचा शोध घेऊन गुन्हे नोंदविण्याचे निर्देश पोलीस यंत्रणेला द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असेही निवेदनात नमूद आहे.

या वेळी अस्मिता मोहिते, मिनाक्षी आगळे, रेखा तायडे, राजनंदनी मंगळे, सोनल आगळे, मालती मोहिते, राज्य प्रशिक्षण विभाग कार्यवाह किर्तीवर्धन तायडे, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वळवी, सूर्यकांत आगळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *