क्रॉपसॅप अंतर्गत हरभरा पिकाची महिला शेतीशाळा उत्साहात संपन्न

नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो पिकांवरील किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) 2025-26 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील मौजा निमगाव येथे दि. 13 फेब्रुवारी रोजी प्रगतीशील महिला शेतकरी गटासाठी हरभरा पिकावरील शेतीशाळेच्या चौथ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले.

हा प्रशिक्षण वर्ग तालुका कृषी अधिकारी एस. एस. राजपूत व मंडळ कृषी अधिकारी पी. एच. धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. उप कृषि अधिकारी हेमंत लाड आणि सहाय्यक कृषि अधिकारी काशिनाथ चौधरी यांनी महिला शेतकऱ्यांना हरभरा पिकावरील सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले.

मुख्य मार्गदर्शन विषय:
हरभरा पिकातील प्रमुख शत्रू किडींची ओळख
हानिकारक किडींचे नियंत्रण उपाय
मित्र किडींची ओळख व संवर्धन
नैसर्गिक पद्धतीने एकात्मिक कीड व्यवस्थापन
महिला शेतकरी प्रशिक्षणार्थींनी प्रत्यक्ष शेत निरीक्षण करून शत्रू व मित्र किडींचे संकलन केले आणि त्यावरील उपायांची माहिती घेतली.

‘रंगीत-संगीत शेतीशाळा’ थीम:
प्रशिक्षण वर्गाची विशेष थीम ‘रंगीत-संगीत शेतीशाळा’ अशी होती. मित्र किडींच्या रंगानुसार गटविभागणी करून सर्व महिला प्रशिक्षणार्थींनी त्या रंगाचे पोशाख परिधान केले. या अभिनव उपक्रमामुळे प्रशिक्षण अधिक आकर्षक व सहभागात्मक झाले.

तसेच सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. अल्पोपहारासह हा प्रशिक्षण वर्ग उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या शेतीशाळेमुळे महिला शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे वैज्ञानिक व नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे ज्ञान प्राप्त झाले असून त्यांच्या उत्पादनवाढीस आणि शाश्वत शेती पद्धतींच्या अवलंबास निश्चितच चालना मिळणार आहे.
collectorofficenandurbar #agriculture
- 0
- 0
- 0
- 0





