
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, नंदुरबार तथा बेनिहेजा सामाजिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उद्योजकता शिबिर उत्साहात संपन्न
तळोदा, दि. 18 मे 2026 : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, नंदुरबार तथा बेनिहेजा सामाजिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने शामली हॉटेल, तळोदा येथे आदिवासी उद्योजकता शिबिर उत्साहात संपन्न झाले. आदिवासी समाजातील युवकांनी उद्योग व व्यवसाय क्षेत्रात पुढे यावे, स्वावलंबी बनावे आणि समाजाला नवी दिशा द्यावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग, अध्यक्ष संजय पुराणिक , तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रगतशील शेतकरी विशाल गावित हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना कल्पेश पाडवी यांनी केली. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी आजच्या परिस्थितीत आदिवासी समाजातील तरुण उद्योजक निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. उद्योजकांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊन आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या शिबिरात विविध क्षेत्रात कार्यरत उद्योजकांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. संदीप बच्छाव यांनी चणे, पुटाणे व गहू प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती दिली. लव पिंपळे यांनी पाणी उत्पादन व्यवसायाविषयी मार्गदर्शन केले. विशाल गावित यांनी तूर डाळ उत्पादन व नामांकन प्राप्त पेटंट याविषयी माहिती दिली. मनोजकुमार भामरे यांनी विषमुक्त शेती व FPO संदर्भात मार्गदर्शन केले. पंकज वसावे यांनी शबरी नॅचरलच्या माध्यमातून तीळ तेल व डिंक प्रक्रिया उद्योगातील अनुभव सांगितले.

तसेच श्रीमती कल्पना सूर्यवंशी यांनी गृह उद्योगाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी शेख नाशिर यांनी शासनाच्या विविध उद्योग योजनांची माहिती देत उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कर्ज प्रक्रिया व शासकीय सहाय्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे अधिकारी केतन देशमुख यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण योजनांची माहिती दिली. कौशल्य आधारित प्रशिक्षणामुळे युवक अधिक सक्षम उद्योजक बनू शकतात, असे त्यांनी सांगितले.

.मार्केटिंग व विक्री कौशल्य या विषयावर सुचित पिंगळे सर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञान, नव्या संधी आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून यशस्वी व्यवसाय कसा उभा करता येतो याची माहिती त्यांनी उदाहरणांसह दिली.
कार्यक्रमाचा समारोप गोपाल महाजन यांनी केला. आभार प्रदर्शन पंकज वसावे यांनी केले. शिबिरास मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी वनांचल समृद्धी अभियान फाउंडेशन, नंदुरबार, अष्टविनायक शिक्षण मंडळ, तळोदा आणि भारतीय जैन संघटना, तळोदा यांनी विशेष सहकार्य केले.
- 0
- 0
- 0
- 0





