नंदुरबार

नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याची दखल

नंदुरबार /सप्त नगरी न्युज

राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतीमान व कालबद्ध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दिनांक २८ एप्रिल २०१५ पासून अंमलात आणला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी दिनांक १ डिसेंबर २०२१ रोजी नाशिकसह राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांमध्ये राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक कार्यालयाचा चौथा वर्धापन दिन नुकताच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आले होते.

या वर्धापन दिनानिमित्त सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. विशेषतः आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात नागरिकांना अधिसूचित सेवा विहित कालावधीत, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.

या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना सेवा हक्क कायद्यांतर्गत उत्कृष्ट अंमलबजावणी व प्रशासकीय नेतृत्वाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अक्राणी येथील तत्कालीन तहसीलदार श्री. ज्ञानेश्वर सपकाळे, माहिती तंत्रज्ञान विभागातील नंदुरबार जिल्हा समन्वयक श्री. योगेश पाटील आणि राज्य सेवा हक्क आयोग कार्यालयातील श्री. महेंद्र गावित यांनाही त्यांच्या योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

याच कार्यक्रमात सन २०२४–२५ या कालावधीत राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक कार्यालयाने केलेल्या कामकाजाचा सविस्तर कार्यवृत्तांत प्रकाशित करण्यात आला. या कार्यवृत्तांताचे प्रकाशन नाशिक लोकसेवा हक्क आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्रीमती कुलकर्णी यांनी सांगितले की, सेवा हक्क कायद्यामुळे शासनाच्या विविध विभागांकडून अधिसूचित करण्यात आलेल्या लोकोपयोगी सेवा व विविध दाखले ठराविक कालावधीत व माफक शुल्कात मिळवण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला आहे. यासाठी नागरिकांनी Applesarkar.mahaonline.gov.in (आपले सरकार) या संकेतस्थळाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

(CollectorOfficeNandurbar)

GoodGovernance #AapleSarkar #CitizenCentricServices

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *