पिंपळखुटा येथील CFR समितीला राज्यस्तरीय ‘अॅग्रोवर्ल्ड आदर्श वृक्ष संवर्धन’ पुरस्कार

नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा येथील सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFR) यांना वृक्ष संवर्धन व जंगल संरक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व आदर्श कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘अॅग्रोवर्ल्ड आदर्श वृक्ष संवर्धन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २०२६ अंतर्गत दि. ३ जानेवारी रोजी शहादा (जि. नंदुरबार) येथे आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या शुभहस्ते हा सन्मान समितीला प्रदान करण्यात आला.
पिंपळखुटा येथील सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीने गेल्या काही वर्षांपासून आपल्या वनहक्क क्षेत्रात वृक्षतोड रोखणे, स्थानिक व देशी वृक्षप्रजातींचे संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन तसेच ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून जंगल संरक्षणासाठी सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध प्रयत्न केले आहेत. या उपक्रमांमुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत झाली असून आदिवासी समाजाच्या उपजीविकेला देखील बळकटी मिळाली आहे.
समितीच्या या कार्याची दखल घेत राज्यस्तरावर हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, तो नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे.
या कार्यक्रमास सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविन राऊत, सचिव रतनसिंग राऊत, खजिनदार श्रीमती पार्वती राऊत, सदस्य गणपत राऊत, हुण्या डाया, रोजगार सेवक अनिल राऊत यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या यशाबद्दल पिंपळखुटा गावासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून समितीचे अभिनंदन होत असून, भविष्यातही वनसंवर्धन, पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार समितीने यावेळी व्यक्त केला.
cfrcommittee #agroworld2026 #ForestRights #TribalEmpowerment
- 0
- 0
- 0
- 0





