प्रभाग क्रमांक ३ च्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या
नगरसेविका जयश्री महाले यांचे रामदास आठवले यांना निवेदन

तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो
तळोदा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील सामाजिक, शैक्षणिक व पायाभूत विकास कामांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका सौ. जयश्री हंसराज महाले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री मा. श्री. रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.
शहादा येथे खाजगी कामानिमित्त आले असताना मा. रामदास आठवले यांची भेट घेऊन नगरसेविका जयश्री महाले यांनी सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी आमदार राजेश पाडवी हेही उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तळोदा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असून, भारतीय जनता पार्टी–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महायुती) यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून जयश्री महाले या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. या प्रभागात अनुसूचित जाती व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून, परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो.
प्रभागातील ओपन प्लेसमध्ये सुसज्ज उद्यान व संरक्षण भिंत उभारणे, ध्यान–धारणा व विपश्यना केंद्रांची निर्मिती, अंतर्गत रस्त्यांवर पथदिव्यांची उभारणी, सामाजिक न्याय भवन अथवा बहुउद्देशीय सभागृह, संविधान भवन तसेच दलित वस्तीतील समाज मंदिरात सुसज्ज ग्रंथालय उभारण्याबाबत निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
ही सर्व विकास कामे सार्वजनिक जागेवर राबविण्यात येणार असून, सामाजिक न्याय, समता व सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या कामांमुळे अनुसूचित जाती समाजासह संपूर्ण परिसराचा सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास नगरसेविका जयश्री महाले यांनी व्यक्त केला.रामदास आठवले यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.
- 3
- 0
- 0
- 0





