दिन विशेषांच्या माध्यमातून ज्ञानवृद्धीची संकल्पना – स्वातंत्र्य सैनिक श्री गोकुळदास देसाई आदर्श विद्या मंदिरात उत्साही प्रश्नमंजुषा

नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो
नंदुरबार स्वा. सै. श्री. गो. दे. आदर्श मराठी व गुजराती विद्या मंदिर, येथे डिसेंबर महिन्यातील जागतिक अपंग दिन, जागतिक ग्राहक दिन, दत्त जयंती व नाताळ या विविध दिनविशेषांचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी भदाणे व ज्येष्ठ शिक्षक मनोज वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रश्नमंजुषा तीन फेऱ्यांत घेण्यात आली. प्रत्येक फेरीत प्रथम उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. प्रत्येक इयत्तेतून पहिली ते चौथी अशा चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना स्पर्धेनंतर तत्काळ बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले.
विजेते विद्यार्थी :
▪ इयत्ता पहिली – मनस्वी निलेश पाटील (ड), अथर्व निलेश माळी (क), भाविका संदीप पाटील (ब)
▪ इयत्ता दुसरी – दिक्षिता ज्ञानेश्वर माळी (इ), भुवनेश्वर योगेश साळुंखे (इ), अनन्या गव्हरलाल कोकणी (क)
▪ इयत्ता तिसरी – अर्णव कुणाल विसपुते (अ), मृदुला तुषार चौधरी (ब), गौरव श्रीराम कुंभार (ब)
▪ इयत्ता चौथी – राजवीर संदीप चौधरी (क), आदित्य तुषार वसईकर (अ), नील सचिन मराठे (अ)
कार्यक्रमाचे रंजक व प्रभावी सूत्रसंचालन सौ. प्रियंका सोनगरे यांनी केले. सरत्या वर्षानिमित्त सौ. वंदना देवरे यांनी भावस्पर्शी कविता सादर केली. दिनविशेषांचा उद्देश सौ. माधुरी पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सोप्या भाषेत मांडला. गुणलेखन सौ. दीपिका शहा यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. मीना अहिरे यांनी केले.
संकल्पनेचा हेतू ही प्रश्नमंजुषा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी भदाणे यांच्या संकल्पनेतून साकारली. दिनविशेष केवळ साजरे न करता त्यामागील मूल्ये, सामाजिक जाणीव, नैतिक शिक्षण व सर्वसामान्य ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हा या संकल्पनेचा मुख्य हेतू होता. प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे, आत्मविश्वास निर्माण करणे, ऐकण्याची व झटपट विचार करण्याची क्षमता विकसित करणे तसेच आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणे हे उद्दिष्ट यशस्वीरीत्या साध्य झाले.
संपूर्ण प्रश्नमंजुषा कार्यक्रम आनंददायी व उत्साही वातावरणात पार पडला आणि विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम ज्ञानवर्धक ठरला.
- 1
- 0
- 0
- 0





