नंदुरबार

अक्कलकुवा तालुक्यातील रोहिणी नाईक यांना उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार

अक्कलकुवा तालुक्यातील रोहिणी नाईक यांना उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार


अक्कलकुवा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जिल्हा परिषद नंदुरबार ग्राम विकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या वतीने उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार वितरण कार्यक्रम मोगी सभागृह, जिल्हा परिषद नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा अभियान सहसंचालक उमेद तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा परमेश्वर राऊत, जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर यांच्यासह अक्कलकुवा तालुका व्यवस्थापक बी.एम.एम., सी.सी. व इतर कॅडर उपस्थित होते. सन २०२५-२६ मध्ये महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय उभारून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजिकांचा यावेळी गौरव करण्यात आला. अक्कलकुवा तालुक्यातून उत्कृष्ट मशरूम उत्पादक उद्योजिका म्हणून सौ. रोहिणी रमेश नाईक यांची निवड करण्यात आली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते उद्योजिका पुरस्कार व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

रोहिणी नाईक यांनी मशरूम शेतीच्या माध्यमातून स्वतःचा रोजगार उभा करून यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे. मशरूम शेती व्यवसायिक मार्गदर्शक तथा कालो कुणबी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वसावे यांचे त्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. राजेंद्र वसावे हे मागील अनेक वर्षांपासून आदिवासी भागातील महिला व युवकांना मशरूम शेतीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या ग्राउंड लेव्हल मार्गदर्शनामुळे अनेक महिला व युवक मशरूम उत्पादनातून रोजगार व आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहेत. रोहिणी नाईक यांनी आपल्या यशाचे श्रेय राजेंद्र वसावे यांच्या मार्गदर्शनाला देत त्यांचे आभार मानले. या पुरस्कारामुळे अक्कलकुवा तालुक्यातील मशरूम शेती करणाऱ्या महिला उत्पादकांना नवी प्रेरणा मिळाली आहे. रोहिणी रमेश नाईक यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *