
भुसावळ तालुक्यातील साकरी येथे घडलेल्या दुहेरी हत्येच्या प्रकरणी पालकमंत्र्यांनी घेतली पिडितांच्या कुटुंबाची भेट
दोषींवर कठोर कारवाईचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन
जळगाव, दि.4 : भुसावळ तालुक्यातील साकरी गावात दिनांक २७ जानेवारी रोजी दोन अल्पवयीन शाळकरी मुलींच्या झालेल्या निर्घृण हत्येची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र शोकभावना व अस्वस्थता पसरली आहे. अत्यंत अमानुष पद्धतीने घडलेल्या या दुहेरी हत्येमुळे दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साकरी गावातील पीडित चौधरी व महाजन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी मृत मुलींच्या पालकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला तसेच संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणातील दोषींवर केली जाईल,असे स्पष्ट करत या प्रकरणावर स्वतः लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी उपसरपंच विनोद सोनवणे, ग्रा.पं. सदस्य रोशन पाटील, किरण चोपडे, माजी सभापती सुनील महाजन आदी उपस्थित होते.
दरम्यान, भुसावळ पोलिसांनी तातडीची कारवाई करत या प्रकरणातील दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत एका संशयिताने मुलींना विहिरीत ढकलल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. या प्रकरणी भुसावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
- 0
- 0
- 0
- 0





