सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 : मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबत शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी कार्यशाळा..

सोलापूर / सप्त नगरी न्युज ब्युरो
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या अनुषंगाने मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व त्रुटीविरहित पार पडावी यासाठी आज हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा उपायुक्त आशिष लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या कार्यशाळेमध्ये सोलापूर शहरातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेत शालेय शिक्षक व शिक्षिकांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन त्यांना मतदान व मतमोजणी संदर्भातील सखोल व प्रत्यक्ष उपयोगी माहिती देण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेदरम्यान ईव्हीएम (Electronic Voting Machine) संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनची मांडणी कशा पद्धतीने करावी, मतदान प्रक्रियेतील टप्पे, मतदार मतदान करताना अनुसरावयाची कार्यपद्धती, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी, तसेच संपूर्ण मतदान यंत्रणेची कार्यप्रणाली याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.यासोबतच ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया, मशीनचा योग्य वापर, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट यांची कार्यपद्धती, मतदानानंतर मशीन सुरक्षितपणे सील व हस्तांतरित करण्याची प्रक्रिया याबाबतही उपायुक्त आशिष लोकरे यांनी उपस्थित सर्वांना सविस्तर व प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली.
प्रत्येक मतदान केंद्रावर पीठासीन अधिकारी व मतदान अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या.यासोबतच ईव्हीएम मशीनची रचना व कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात आली. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट यांची मांडणी, मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल प्रक्रिया, मशीन सीलिंगची कार्यवाही तसेच मतदानाच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या प्रक्रियेचे सविस्तर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले मतदानादरम्यान मतदारांची ओळख तपासणी, बोटाला शाई लावणे, सही/ठसा घेणे, स्लिपद्वारे मताची खात्री देण्याची मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षितरीत्या सील करून स्ट्रॉंगरूमकडे हस्तांतरित करण्याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. मतदान केंद्रावर आचारसंहिता, शिस्त व निष्पक्षतेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह राहण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने नियम व सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
शिक्षक व शिक्षिका हे समाजातील विश्वासार्ह घटक असून त्यांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविता येते, असेही त्यांनी नमूद केले.सदर कार्यशाळेमुळे उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिकांना मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबत स्पष्टता प्राप्त झाली असून आगामी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
- 0
- 0
- 0
- 0





