नंदुरबार

नुकसानीचे पंचनाने सादर करूनही जाणीवपूर्वक बाधित क्षेत्रात तेलखेडी गावाला क्षेत्र यादीत समावेश न करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी होऊन तात्काळ. नुकसान भरपाई द्या. युवा क्रांती व तेलखेडी येथील बाधित शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

नुकसानीचे पंचनाने सादर करूनही जाणीवपूर्वक बाधित क्षेत्रात तेलखेडी गावाला क्षेत्र यादीत समावेश न करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी होऊन तात्काळ. नुकसान भरपाई द्या.

युवा क्रांती व तेलखेडी येथील बाधित शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन…

अक्कलकुवा / सप्त नगरी न्युज ब्युरो

नोव्हेंबर २०२५ च्या अवकाळी पावसामुळे तेलखेडी गावातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही सरसकट पंचनामे असतानादेखील बाधित क्षेत्र यादीत समावेश न केल्याबाबत चौकशी करून तातडीने अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करा या मागणीचे निवेदन
  तेलखेडीच्या बाधित शेतकऱ्यांसह युवा क्रांती नंदुरबार या सामाजिक व शेतकरी हितासाठी कार्यरत असलेल्या संघटनेच्या वतीने अक्राणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
     निवेदनात म्हटले आहे कि  मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तेलखेडी गावातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून, सदर नुकसान हे प्रत्यक्ष पाहणीस पात्र व निर्विवाद स्वरूपाचे आहे.
सदर अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुक्यातील व परिसरातील अनेक गावांमध्ये शासनामार्फत सरसकट पंचनामे करण्यात आलेले असून, त्या गावांचा बाधित क्षेत्र म्हणून समावेश करून शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. मात्र अत्यंत गंभीर, अन्यायकारक व संशयास्पद बाब अशी आहे की, तेलखेडी गावामध्ये प्रत्यक्षात सरसकट पंचनामे झालेले असताना, तसेच शासनाने निश्चित केलेल्या त्रिस्तरीय समितीतील कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या सह्या असलेले अवकाळी पीक पंचनामे विधिवत तयार करून संबंधित कार्यालयात जमा करून देखील, तेलखेडी गावाचा बाधित क्षेत्र यादीत समावेश करण्यात आलेला नाही.
यामुळे तेलखेडी येथील शेतकऱ्यांना शासनाच्या अवकाळी नुकसान भरपाईपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आलेले असून, हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नसून, हेतुपुरस्सर दुर्लक्ष व अन्याय असल्याची तीव्र शंका “युवा क्रांती” संघटनेसह संपूर्ण शेतकरी समाजामध्ये निर्माण झालेली आहे. ज्या निकषांवर इतर गावांतील शेतकऱ्यांना एकरी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, तेच सर्व निकष तेलखेडी गावास पूर्णपणे लागू होत असतानासुद्धा आमच्या गावाशी दुजाभाव का केला जात आहे, हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
याहून अधिक गंभीर बाब म्हणजे, सदर प्रकरणात कृषी सहाय्यक श्री. विजय बोलकारे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद असून, पंचनामा व पुढील कार्यवाही संदर्भात त्यांनी अप्रत्यक्षपणे पैशाची मागणी केल्याचा संशय शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. सदर मागणीस नकार दिल्यानंतर तेलखेडी गावाचा बाधित क्षेत्र यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हा प्रकार शासकीय पदाचा गैरवापर, भ्रष्टाचार, तसेच शासकीय कर्तव्यात गंभीर कसूर या स्वरूपाचा असून, याची सखोल, निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
शासनाने जाहीर केलेली अवकाळी नुकसान भरपाई ही कोणत्याही अधिकाऱ्याची मर्जी किंवा उपकार नसून, ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा कायदेशीर, घटनात्मक व नैतिक हक्क आहे. त्या हक्कापासून एखाद्या संपूर्ण गावाला वंचित ठेवणे हे संविधानातील समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात असून, प्रशासनाच्या पारदर्शकतेवर व विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. “युवा क्रांती” संघटना शेतकऱ्यांवरील कोणताही अन्याय सहन करणार नाही, ही बाब स्पष्टपणे नमूद करीत आहोत.
त्यामुळे “युवा क्रांती” संघटनेच्या वतीने ठामपणे विनंती करण्यात येते की, तेलखेडी गावातील अवकाळी पीक पंचनाम्यांची तातडीने नवीन तपासणी होऊन त्रिस्तरीय समितीच्या संपूर्ण कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्यात यावी, इतर बाधित गावांना ज्या निकषांवर एकरी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, तेच निकष तेलखेडी गावास लागू करून तातडीने नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी, तसेच कृषी सहाय्यक श्री. विजय बोलकारे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार व कर्तव्यात कसूर या अनुषंगाने स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी.
         आपणास स्पष्टपणे कळविण्यात येते की, वरील मागण्यांवर पुढील दोन दिवसांच्या आत योग्य, ठोस व न्याय्य कार्यवाही न झाल्यास, नाईलाजास्तव “युवा क्रांती” संघटनेच्या नेतृत्वाखाली तेलखेडी येथील सर्व शेतकरी बांधव शहादा ते धडगाव मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यास बाध्य होतील. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस संपूर्णपणे संबंधित प्रशासन जबाबदार राहील, याची गंभीर नोंद घ्यावी.
तरी सदर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन तेलखेडी येथील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी दिलेल्या निवेदनातून युवा क्रांती धडगाव तालुका प्रमुख लक्ष्मण पाडवी, संपर्क प्रमुख बावा पावरासह बाधित शेतकरी माका पावरा, रुमा पाडवी, गोवा पाडवी, मेरसिंग पावरा,ठुमला पावरा, किसन वळवी, सामल्या पावरा, विशाल पावरा, केल्या पावरा शिमला पावरा, मगन पाडवी, रामदास पाडवी,विरसिंग वळवी, किसन पावरा,आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *