नंदुरबार

सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार अंतर्गत चालू कामांचा आढावा व गुणवत्ता नियंत्रणावर भर

सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार अंतर्गत चालू कामांचा आढावा व गुणवत्ता नियंत्रणावर भर

नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो

जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने पाहणी व मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अनुषंगाने श्री. अंकुश अ. पालवे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार यांनी डिसेंबर २०२५ महिन्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची सविस्तर पाहणी केली.

दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी नगर पालिका क्षेत्रातील पॅव्हर ब्लॉक तसेच सामाजिक सभागृहांच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. कामाच्या अंमलबजावणीदरम्यान घ्यावयाच्या तांत्रिक दक्षतेबाबत संबंधित शाखा अभियंता व ठेकेदारांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

केंद्रीय विकास निधी अंतर्गत मंजूर कामांची पाहणी करताना वापरण्यात आलेली खडी अपेक्षित मानकापेक्षा मोठ्या आकाराची आढळून आली. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने सदर कामाचा संपूर्ण पंचनामा करून ते काम नामंजूर (Reject) करण्यात आले. या वेळी श्री. गणपत गावीत, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १, नंदुरबार उपस्थित होते. दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला.

तसेच उमदे खुर्द, ता. व जि. नंदुरबार येथील ३००० मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाच्या कामांची पाहणी करून संबंधित अभियंते व ठेकेदारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. जिल्हा व सत्र न्यायालय, नंदुरबार येथील इमारतीची पाहणी करताना बाह्य रंगकाम प्रगतीपथावर असल्याचे निदर्शनास आले असून त्या कामासंबंधी योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयात पायाभूत विकास प्रकल्पांसाठी महाराष्ट्र संपत्ती पंजीकरण पद्धती (MHUID) या पोर्टलवरून युनिक आयडी क्रमांक घेण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत डिजिटल नोंदणी व पारदर्शक प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

ADB–EPC–39 अंतर्गत सावळदे–कोरीट–रणाळा–शनिमांडळ ते छडवेल या रस्त्यावर जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या Soil Stabilization या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात सर्व शाखा अभियंत्यांना आधुनिक तंत्रज्ञान व त्याचे फायदे समजावून सांगण्यात आले.

याशिवाय नवापूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय, विश्रामगृह, वर्ग–४ कर्मचारी निवासस्थान तसेच AMC अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या. तळोदा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयीन इमारतीचीही पाहणी करून कामाच्या गुणवत्तेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या सर्व पाहण्यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार यांनी गुणवत्ता नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शक प्रशासन यांवर विशेष भर देत जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

PublicWorksDepartment #InfrastructureDevelopment #PWDWorks

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *