नंदुरबार

धडगाव विश्व आदिवासी दिनाचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, नृत्य अन् आदिवासी संस्कृतीच्या जतनाचा जागर

धडगाव विश्व आदिवासी दिनाचा जल्लोष!
पारंपरिक वेशभूषा, नृत्य अन् आदिवासी संस्कृतीच्या जतनाचा जागर

धडगाव : महाराज जनार्दन पोहऱ्या वळवी आर्ट्स, कॉमर्स आणि श्री. व्ही. के. कुलकर्णी सायन्स महाविद्यालय, धडगाव येथे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालय परिसरात आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा जागर पाहायला मिळाला.


या कार्यक्रमात प्राध्यापक डॉ. केशव पावरा तसेच लोकनियुक्त सरपंच प्रा. अर्जुन पावरा यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, गौरवशाली इतिहास, परंपरा आणि अस्मिता जपण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आदिवासी संस्कृतीचे संवर्धन, जतन आणि त्याबाबतची जनजागृती काळाची गरज असून, आधुनिकतेच्या प्रवाहात आपल्या पारंपरिक संस्कृतीपासून तरुणांनी दूर जाऊ नये. आपल्या समाजाचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेऊन तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन मार्गदर्शकांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राजू पवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या काळातील तरुणांची सामाजिक भूमिका अधोरेखित केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा पुढे नेण्यासाठी आजची तरुणाई महत्त्वाची असून, प्रत्येक विद्यार्थ्याने भारतीय संविधानाचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.


यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तसेच विविध विभागांतील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करून पारंपरिक नृत्य, गीत आणि सांस्कृतिक सादरीकरणातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. ढोल-ताशांचा नाद, पारंपरिक नृत्य आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर आदिवासी संस्कृतीच्या रंगात रंगून गेला.

विशेष म्हणजे, प्रा. डॉ. केशव पावरा यांनी आपल्या मनोगतातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. इतिहास, संस्कृती आणि अस्मिता यांची जपणूक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला.
एकंदरीत, धडगावातील या महाविद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्त ज्ञान, संस्कृती आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आदिवासी इतिहास व संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली असून, गौरवशाली आदिवासी वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार या कार्यक्रमातून करण्यात आला.

प्राध्यापक एस एस पाटील सर, डॉक्टर मनोहर पाटील डॉक्टर अशोक राठोड डॉक्टर हरिभाऊ पवार डॉक्टर एस आर महाले डॉक्टर दिनेश पाटील कार्यालय अधीक्षक मनोज भाऊसाहेब डॉ.अनिल शिंदे डॉक्टर लक्ष्मण सूर्यवंशी प्राध्यापक गणेश मोरे प्राध्यापक तुषार भंडारकर प्राध्यापिका कल्पना साळवे सह इतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. डॉ. राजू पवार, प्राचार्य :
“विश्व आदिवासी दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि परंपरेची जाणीव होते. आजच्या तरुणांनी शिक्षणासोबतच संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *