नंदुरबार

-राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात संपन्नयशस्वी महिला उद्योजिकांचा सन्मान; बचत गटांना आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव

-राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात संपन्न
यशस्वी महिला उद्योजिकांचा सन्मान; बचत गटांना आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव

नंदुरबार, दि. 05 ऑक्टोंबर :
आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार यांच्यावतीने सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून तसेच राणी दुर्गावती जयंतीनिमित्त ‘राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण’ कार्यक्रमांतर्गत विशेष महिला मेळावा संपन्न झाला.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार येथे झालेल्या या मेळाव्यास आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी ,पर्यवेक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी पंकज पटले व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवराच्या हस्ते शासकीय आदिवासी विकास वसतिगृहात राहून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या, शासकीय नोकरी मिळवलेल्या तसेच उच्च पदवी संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा तसेच क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचाही गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे शहादा, नवापूर व नंदुरबार तालुक्यात 1 जुलै ते 15 सप्टेंबरदरम्यान स्थापन झालेल्या पात्र महिला बचत गटांना थेट बँक खात्यात (DBT) आर्थिक मदत जमा करण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्प योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, तर सन 2023-24 मध्ये निवड झालेल्या घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अधिकृत निवड प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

मेळाव्यात महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच बचत गट सक्षमीकरण कार्यशाळेद्वारे महिलांना स्वावलंबनासाठी मार्गदर्शन करण्यात आले. विविध शासकीय यंत्रणांच्या तज्ज्ञ प्रतिनिधींनी स्वयंरोजगार, उद्योग निर्मिती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य योजना व विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. महिला व बचतगटांना स्वावलंबी बनविण्यासाठी शबरी महामंडळाचे हितेश पाटील, उमेद यशवंत ठाकूर व अजय जाधव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या श्रीमती कांता बनकर, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख राजेंद्र दहातोंडे, जिल्हा उद्योग केंद्राचे गिरीष चौधरी यांनी त्यांच्या विभागातील योजनेची माहिती दिली.

या मेळाव्यास नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यातील 600 हून अधिक महिला व बचत गटांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मेळावा यशस्वी करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *