सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
पतंजली योग समितीतर्फे 15 सप्टेंबरपासून उपक्रम; 25 दिवस चालणार प्रशिक्षण

नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो नंदुरबार तालुका पतंजली योग समितीतर्फे नंदुरबार शहरात सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 15 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत 25 दिवस चालणार असून, दररोज सकाळी 5:30 ते 7 या वेळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिबिरात अनुभवी व तज्ज्ञ योगशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिरामध्ये सूर्यनमस्कार, योगिक जॉगिंग, दंडबैठका, सूक्ष्म व्यायाम तसेच विविध व्याधींवर मात करण्यासाठी उपयुक्त योगासने आणि प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच अष्टांग योग, षटकर्म, पंचप्राण, पंचकोश, ध्यान, योगनिद्रा आणि आयुर्वेद याबाबत सखोल माहिती देण्यात येणार आहे.
योगशिबिर यशस्वीपणे पूर्ण करून सहयोग शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या साधकांना जिल्हा पतंजली योग समितीतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच भविष्यात पतंजली योगपीठ, हरिद्वार येथे होणाऱ्या योग शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळू शकणार आहे.
आपण या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवून योगशिक्षकाच्या भूमिकेतून इतरांना मार्गदर्शन करण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- 0
- 0
- 0
- 0





