
कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता
कोल्हापूर महानगरपालिकेत तब्बल पंधरा वर्षांनी सत्तांतर झाले आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या कोल्हापूरात महायुतीने सत्ता काबीज केली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये ४४ जागांवर विजय मिळवून महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ३६ जागा जिंकून प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी ३२७ उमेदवार रिंगणात होते. यंदा प्रथमच बहुसदस्यीय पध्दतीने निवडणूक झाल्याने पक्षीय पातळीवर पॅनल करुन निवडणूक लढविण्याची तयारी पक्षांनी केली. यामध्ये महायुतीच्या उमेदवारांना प्राबल्य मिळाले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतिम निकालानुसार भाजपला २५, शिवसेना शिंदे गट १५, राष्ट्रवादी अजित पवार गट ४ असे मिळून महायुतीच्या ४४ जागा जिंकून आल्या. तर दुसरीकडे एकट्या काॅंग्रेस पक्षाने ३५ जागा जिंकल्या आहेत.शिवसेना उध्दव ठाकरे गटाची एक अशा महाविकास आघाडीने ३६ जागांवर विजय मिळविला. जनसुराज्य शक्ती पक्षाचा एक उमेदवार निवडून आला असून हा पक्ष महायुतीचा मित्र पक्ष मानला जातो त्यामुळे महायुतीत सहभागी होईल असा अंदाज आहे.दुपारी तीन वाजेपर्यंत कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल स्पष्ट झाला.
- 0
- 0
- 0
- 0





