आरोग्य रायगड

जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ

जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ

रायगड | सप्त नगरी न्युज ब्युरो

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि रजोनिवृत्तीच्या (Menopause) काळात उद्भवणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक समस्यांवर योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ करण्यात आला.


शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले हे क्लिनिक जिल्ह्यातील ४० ते ५५ वयोगटातील महिलांसाठी मकर संक्रांतीचे एक अनोखे आरोग्यदायी वाण ठरले आहे. या विशेष उपक्रमाचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

रजोनिवृत्ती हा महिलांच्या आयुष्यातील एक अत्यंत संवेदनशील टप्पा असून या काळात अनेक स्त्रिया अनेक समस्यांशी लढा देत असतात. हे लक्षात घेऊन या क्लिनिकच्या माध्यमातून महिलांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भोपाळे यांनी रजोनिवृत्ती दरम्यान शरीरात होणाऱ्या बदलांची सविस्तर माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, “पाळी थांबण्याच्या प्रक्रियेत शरीरातील हार्मोन्सची पातळी कमी-जास्त होते, ज्यामुळे हाडांचा ठिसूळपणा वाढतो व थोडीशी पडझड झाल्यास देखील हाड मोडू शकते. तसेच उष्णता जाणवते (Hot Flashes) आणि थकवा यांसारखे त्रास उद्भवतात. योग्य वैद्यकीय सल्ला आणि जीवनशैलीत बदल केल्यास हे त्रास सहज दूर होऊ शकतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रजोनिवृत्तीचा परिणाम केवळ शारीरिक स्वास्थ्यावरच नाही, तर मानसिक आरोग्यावरही होतो. याबाबत अधिक माहिती देताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अर्चना सिंग म्हणाल्या की, “हार्मोनल बदलांमुळे या वयोगटातील महिलांमध्ये चिडचिड होणे, अचानक नैराश्य येणे किंवा झोप न लागणे अशा समस्या दिसून येतात. अशा वेळी कुटुंबाचा आधार आणि तज्ज्ञांचे समुपदेशन महिलांना या स्थितीतून बाहेर पडण्यास मदत करते.”

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी यांनी या नवीन सुविधेबाबत अधिक माहिती दिली. “जिल्हा रुग्णालयातील हे रजोनिवृत्ती क्लिनिक दर बुधवारी महिलांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल. या वयोगटातील महिलांची मोफत तपासणी, औषधोपचार आणि समुपदेशन या दिवशी केले जाईल,” असे त्यांनी जाहीर केले.

“जास्तीत जास्त महिलांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या उद्घाटन कार्यक्रमाला मेट्रन गायत्री म्हात्रे, असिस्टंट मेट्रन अनिता भोपी, विविध विभागांच्या परिसेविका, रुग्णालयातील कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिम सुतार यांनी केले.

जिल्हा रुग्णालयाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त होत असून, स्त्रियांच्या आरोग्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन या निमित्ताने समोर आला आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *