निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरूवात.
मतदान केंद्राकरीता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके करण्यात आली गठीत.
अनुपस्थितांवर कडक कारवाईचे निर्देश.

रायगड / सप्त नगरी न्युज ब्युरो
रायगड – रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेल महानगरपालिकेची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडावी यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षणास आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगृहात सुरूवात झाली.

पनवेल महानगरपालिकेतील २० प्रभागनिहाय क्षेत्राकरीता ६६० मतदान केंद्र आहे. सदर केंद्राकरीता ६ निवडणूक निर्णय अधिकारी (RO), ६८ क्षेत्रीय अधिकारी (ZO) तसेच मतदान केंद्राध्यक्ष (PRO), सहाय्यक मतदान अधिकारी (PO-१,२,३) शिपाई आणि ६५ राखीव मतदान केंद्राकरीता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके गठीत करण्यात आले आहे.

यातील क्षेत्रीय अधिकारी (ZO) तसेच मतदान केंद्राध्यक्ष (PRO), सहाय्यक मतदान अधिकारी (PO-१,२,३)शिपाई यांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत सहभागी एकूण ४ हजार २०५ अधिकरी व कर्मचाऱ्यांकरीता आज पासून ते ३१ डिसेंबर दरम्यान प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रियेतील सर्व जबाबदाऱ्या उपस्थितांना समजावून सांगण्यात आल्या. मतदानाच्या आधीचा दिवस , प्रत्यक्ष मतदानाचा दिवस व नंतरच्या दिवसाचे कार्य, जबाबदाऱ्या यावेळी मार्गदर्शकांनी समजावून सांगितल्या.
तसेच यावेळी मतमोजणी प्रक्रिया, मॉक पोल, बोगस मतदार ओळखणे, टेंडर वोटिंग, घोषणा पत्र, डायरी लिहणे , कायदेशीरबाबी, ई.व्ही.एम. मशीन प्रत्यक्ष हाताळणी तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणूक प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे कोणतीही त्रुटी, गोंधळ किंवा गैरप्रकार टाळून निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह व पारदर्शक ठेवणे हा आहे. पुढच्या दोन दिवसातही हे प्रशिक्षण सुरू असणार आहे. यावेळी उपस्थित सर्व अधिकरी व कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यात आली. यावेळी श्री. पोंक्षे, निवृत्त अधिकारी विनय कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणास उपस्थित राहणे अधिकारी, कर्मचारी यांना बंधनकारक आहे. प्रशिक्षणात अनुपस्थित राहणाऱ्या किंवा आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी तथा पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले आहे.
- 0
- 0
- 0
- 0





