बीड

मोठी स्वप्ने पाहा ; जिद्दीने प्रयत्न करा – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

मोठी स्वप्ने पाहा ; जिद्दीने प्रयत्न करा — जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

‘कलेक्टरांशी गप्पा’ उपक्रमात कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थिनींशी संवाद

बीड, दि. २४ : मोठी स्वप्ने पाहून ती साकारण्यासाठी जिद्दीने मेहनत करा. अपयशाची भीती न बाळगता सातत्याने प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी विद्यार्थिनींना केले. ‘कलेक्टरांशी गप्पा’ उपक्रमांतर्गत त्यांनी गेवराई येथील कस्तुरबा गांधी निवासी बाल विद्यालयाच्या विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापिका व शिक्षक उपस्थित होते.

कोणत्याही परिस्थितीत हार न मानता सातत्याने प्रयत्न केल्यास यश मिळविता येते. स्वप्ने साकार करण्यासाठी कठोर परिश्रमांना पर्याय नाही, असे जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. विद्यार्थिनींना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देत त्यांनी अभ्यासाचे नियोजन व भविष्यातील उद्दिष्टांबाबत चर्चा केली.

या संवादादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेतील सोयीसुविधा व दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. विद्यार्थिनींच्या निवास व शिक्षणासंबंधीच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थिनींची शैक्षणिक प्रगती व कौटुंबिक पार्श्वभूमी यांचीही माहिती घेण्यात आली.

या उपक्रमातून विद्यार्थिनींना जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून आपल्या अडचणी व भविष्यातील उद्दिष्टे मांडण्याची संधी मिळाली.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *