.तळोदा महाविद्यालयात रेड रिबीन क्लबचे उद्घाटन

तळोदा : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व आयसीटीसी, उपजिल्हा रुग्णालय, तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी रेड रिबीन क्लबचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे हा या क्लबचा प्रमुख उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व वाणिज्य ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय रोहित भाऊ माळी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी एचआयव्ही/एड्सविषयी योग्य माहिती जाणून घेऊन समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या तथा आयसीटीसी, उपजिल्हा रुग्णालय, तळोदा यांच्या समन्वयक राखी पारेख यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही व एड्सविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच एचआयव्ही प्रतिबंध, तपासणी, समुपदेशन आणि उपचाराच्या दृष्टीने आयसीटीसीची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास आयसीटीसी केंद्र व उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत दलाल यांनी रेड रिबीन क्लब स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी क्लबच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. जी. एम. मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ललित पाटील यांनी केले, तर आभार महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनीता गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
- 0
- 0
- 0
- 0





