नंदुरबारच्या दूध उत्पादक पशुपालकांना शासनाने चारा पुरवण्याची मागणी
पालकमंत्र्यासह जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
नंदुरबार
(प्रतिनिधी) यंदा निसर्गाने नंदुरबारवर अवकृपा दाखवल्याने दीड महिन्या पासून पावसाने दडी मारल्यामुळे गुराढोरांना चारा उपलब्ध नाही. यामुळे दूध उत्पादक पशुपालक अडचणीत आले असल्याने शासनाने तातडीने चारा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात दूध उत्पादकांनी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, प्रांताधिकारी आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले आहे,

या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जनावरांना चारा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी वरून राजा अपेक्षेप्रमाणे बरसला नाही. दुभती जनावरे आणि भाकड जनावरे यांच्या साठी असलेला चारा संपत आला. शेत जमिनीवर हिरवळ नसल्याने हिरवा चारा व कोरडा चारा देखील उपलब्ध नाही. यामुळे दुभती जनावरे दूध देत नाही. दुधाचे उत्पन्न कमी झाले असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरे सांभाळणे देखील मुश्किल झाले आहे.

पशुपालक आणि गुरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून दुग्ध व्यवसायावरच कुटुंबाचे उदरनिर्वाह आहे. चाऱ्या अभावी संकट निर्माण झाले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने तातडीने चारा छावणी उभारून मदत करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर जयसिंग भरवाड, लक्ष्मण गवळी, भूपेंद्र ठाकूर, चंद्रकांत गवळी, देवा भरवाड, रामसिंग पाटील, यासह असंख्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
- 0
- 0
- 0
- 0





