महाराष्ट्र

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात
-जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

राज्य रस्ते विकास महामंडळाने विहिरीच्या संरक्षक कठड्याचे काम तात्काळ सुरू करावे

    जिल्हाधिकारी यांनी केली धोकादायक रहदारी मार्गाची पाहणी.

    पंढरपूर:-(१६), पंढरपूर सातारा महामार्गावरील वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांनी दिल्या.
    रविवार दि. 14 जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पंढरपूर – सातारा महामार्गावरील तांदूळवाडी जवळ टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटून
    रस्त्यालगत असलेल्या विहिरीत वाहन कोसळले या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला.

    या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांनी तांदुळवाडी (ता.माळशिरस) हद्दीतील महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप अभियंता पी. एस.राऊत तसेच संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

    यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले , सातारा- पंढरपूर महामार्गावरील तांदुळवाडी हद्दीत रस्त्यालगत धोकादायक तीन विहिरी असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तात्काळ रस्त्यालगत असणाऱ्या विहिरींच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करावे. तसेच अपघात प्रवण क्षेत्रावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशा सूचना करून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे का, भूसंपादन प्रमाणे रस्ता झाला आहे का, मार्गावरील पुल व रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार झाले आहे का, रस्त्याची रुंदी, रस्त्यावर गतिरोधक, लोखंडी बॅरिकेट, रिफ्लेक्टर संरक्षण कठडे, प्रकाश व्यवस्था, यासारख्या उपाययोजना आहेत का याची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी येथील ग्रामस्थांनी तांदुळवाडी हद्दीत वारंवार अपघात घडत असून रस्त्याची काम भूसंपादनाप्रमाणे झाले नाही. रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच तांदुळवाडी हद्दीतील उघडे पुलावर सतत खड्डे पडत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित ठेकेदाराकडून तात्पुरती डागडुजी करण्यात येते. सदर पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करावे अशी मागणी केली. जिल्हाधिकारी यांनी तांदुळवाडी हद्दीतील महामार्गालगत असणाऱ्या तीन विहिरींची तसेच उघडे पूल येथील पाऊणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

    • 0
    • 0
    • 0
    • 0

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *