आंतरराष्ट्रीय खान्देश महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेल्या कुणबी पाटील समाजाच्या २१० विद्यार्थ्यांचा व समाजरत्न सुरतमध्ये सन्मान

उत्तर महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेल्या कुणबी पाटील समाजाच्या २१० विद्यार्थ्यांचा व समाजरत्न सुरतमध्ये सन्मान

सुरत : सप्त | नगरी न्यूज ब्युरो :-

समस्त मराठा कुणबी पाटील समाज वेल्फेअर ट्रस्ट, सुरत यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी व समाजरत्न सन्मान सोहळा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विशेष म्हणजे सन्मानित करण्यात आलेले बहुतांश विद्यार्थी व समाजबांधव हे धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील मूळ रहिवासी असून सध्या सुरत (गुजरात) येथे वास्तव्यास आहेत.

कार्यक्रमाच्या सुरवातीला बारडोली येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ७ जणांना दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

तद्नंतर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांतील एकूण २१० विद्यार्थ्यांचा गौरव व सन्मान करण्यात आला. यासोबतच शिक्षण, सामाजिक कार्य, प्रशासन, उद्योग-व्यवसाय, पोलीस सेवा आणि इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील यशस्वी व्यक्तींचाही विशेष सन्मान करण्यात आला.

राणी लक्ष्मीबाई कम्युनिटी हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, समाजबांधव आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. मराठा पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष छोटूभाई पाटील, डेप्युटी मेयर सुधाकर चौधरी, माजी डेप्युटी मेयर डॉ. नरेंद्र पाटील, रवींद्र पाटील, नगरसेवक भाईदासभाई पाटील, संजयभाई पाटील, रवींद्र खैरनार, माजी नगरसेवक विनोद भगवान पाटील, नगरसेविका सौ. अलका पाटील, सौ. सुषमा पाटील तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लिंबायत विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. संगीताताई पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा संदेश पाठविला, तर जिग्नेशभाई पाटील यांनीही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती पदक प्राप्त पीएसआय संजय मुरलीधर पाटील तसेच सुनील गोरख देसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या पाटील समाजातील सर्व नगरसेवकांचाही गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख अतिथींची भाषणे, ट्रस्टची माहिती आणि २१० विद्यार्थ्यांचा सन्मान असा संपूर्ण कार्यक्रम केवळ तीन तासांत शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आला. या यशामागे महिला आयोजक समितीचे उत्कृष्ट नियोजन आणि स्वयंसेवकांचे अथक परिश्रम महत्त्वाचे ठरले.

ट्रस्टचे संस्थापक दिपक आर. पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी, समाजबांधव, महिला समिती, स्वयंसेवक आणि दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले. उत्तर महाराष्ट्रातून सुरतमध्ये स्थायिक झालेल्या समाजबांधवांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, गुणवंतांचा गौरव करणे आणि समाजातील यशस्वी व्यक्तींचे कार्य नव्या पिढीसमोर आणणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यातही समाजातील विद्यार्थी, युवक आणि विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *