Uncategorized नंदुरबार महाराष्ट्र

पिंपळोदची कन्या ते आदर्श उद्योजिका – रमिला वसावे यांना ‘आद्या पुरस्कार’

पिंपळोदची कन्या ते आदर्श उद्योजिका – रमिला वसावे यांना ‘आद्या पुरस्कार’

नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद येथील सौ. रमिला कालूसिंग वसावे यांना समाजात प्रेरणादायी बदल घडविल्याबद्दल ‘आद्या पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि Indian Direct Selling Association यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाविकास २०२६ : महाराष्ट्र डायरेक्ट सेलिंग समिट’ अंतर्गत हा सन्मान देण्यात आला.

अवघ्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या रमिला वसावे यांनी जिद्द, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर स्वतःसह इतर महिलांसाठीही प्रगतीची नवी दिशा निर्माण केली आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी त्या महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्राशी जोडल्या गेल्या. माविम व गाव विकास समितीच्या माध्यमातून त्यांना गांडूळखत निर्मिती, शेळीपालन, सेंद्रिय शेती, पशुपालन, जल जीवन मिशन, बुक-कीपिंग, महिला सक्षमीकरण, नेतृत्व विकास आणि पंचायत राज यांसारख्या विविध विषयांवरील प्रशिक्षण मिळाले.

या प्रशिक्षणांच्या बळावर त्यांनी स्वतःचा शेती व्यवसाय सक्षम केला. बचत गटांच्या माध्यमातून बँकेच्या सहकार्याने शेती औजारे खरेदी केली व ती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा पूरक व्यवसाय सुरू केला. त्यांच्या या उपक्रमामुळे कुटुंबाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली.

माविम व ज्ञानदीप गाव विकास समिती, पिंपळोद यांच्या सहकार्याने त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रसार केला. पाणी फाउंडेशन यांच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत पाण्याचा शाश्वत वापर सुनिश्चित केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २५ कुटुंबे आणि ५० हून अधिक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.

सामाजिक क्षेत्रातही त्या तितक्याच सक्रिय आहेत. जिल्हा महिला दक्षता समितीच्या सदस्या म्हणून बालविवाह प्रतिबंध, स्त्री अत्याचार विरोध, दारूबंदी आंदोलन आणि महिला हक्कांसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आदिवासी महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी DSC संस्था च्या मदतीने १५०० हून अधिक झाडांची लागवड केली आहे. गांडूळखत, दशपर्णी अर्क आणि जीवामृत तयार करून सेंद्रिय शेतीला चालना दिली आहे.

रमिला वसावे या उत्कृष्ट वाहनचालकही आहेत. ८ मार्च २०२५ रोजी शबरी आदिवासी विभाग व वित्त महामंडळामार्फत त्यांना बोलेरो प्रवासी वाहन उपलब्ध झाले. नंदुरबार जिल्ह्यातील पहिल्या आदिवासी महिला चारचाकी वाहनचालक म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

संघर्षातून उभ्या राहिलेल्या रमिला वसावे यांचे कार्य ग्रामीण महिला सक्षमीकरणाचा आदर्श ठरत असून त्यांच्या यशामुळे अनेक महिलांना नवी प्रेरणा आणि दिशा मिळत आहे.

Mavim Nandurbar

CollectorOffice #mavim

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *