धुळे

धुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

धुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

धुळे, दि. २७ (जिमाका वृत्तसेवा) : आखातातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सांगितले की, जिल्ह्यात १४० पेट्रोल पंप आहेत. तेथे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून जिल्ह्यास इंधनाचा नियमितपणे पुरवठा सुरू आहे. जिल्हा प्रशासन इंधन पुरवठ्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच गरजेपेक्षा जास्त इंधनाची खरेदी करून अनावश्यक साठा करू नये.
आखातातील युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा किंवा अनधिकृत साठा किंवा चढ्या दराने विक्री करणे हा जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. या परिस्थितीवरही पुरवठा विभाग लक्ष ठेवून आहे. याबरोबरच नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, ड्रम आदींमध्ये इंधनाची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारे इंधनाची साठवणूक ही सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन असून ते अत्यंत धोकेदायक आहे. त्यामुळे नागरिकांनी इंधनाचा साठा करू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.

गॅस सिलिंडरकरीता नियंत्रण कक्ष

तसेच घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर पुरवठा वितरणाबाबत तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तेथे पुरवठा निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांच्या गॅस सिलिंडर वितरणाबाबत काही तक्रारी असतील, तर नियंत्रण कक्षात संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *