ठाणे

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुरबाड तालुक्यात दौरा; विकासकामांचा सखोल आढावा

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुरबाड तालुक्यात दौरा; विकासकामांचा सखोल आढावा

ठाणे, दि. २७ : ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी गुरुवार, दि. २६ मार्च, २०२६ रोजी मुरबाड तालुक्याचा दौरा करून विविध ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे तसेच सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाच्या सर्वसमावेशक व लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक सजग व तत्पर राहावे, तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

ग्रामपंचायतींचा विकास आणि लोकसहभाग

दौऱ्याची सुरुवात मासले ग्रामपंचायतीपासून करण्यात आली. येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. ‘एक कुटुंब एक संचिका’ उपक्रम तसेच ‘पोषण परसबाग’ यांची पाहणी करून त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक केले. महिला बचत गटांशी संवाद साधताना स्थानिक स्तरावर होत असलेल्या उपक्रमांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
न्हावे येथे ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होईल यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना देण्यात आल्या.

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शेलशेत येथील अंगणवाडी तसेच किशोर व सरळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देण्यात आली. औषध साठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, माता-बालकांचे आरोग्य व पोषण या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. यामध्ये आढळलेल्या त्रुटी तात्काळ दूर करण्याच्या सूचना देत सेवा अधिक गुणवत्तापूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सिंचन सुविधांचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. शिरवली (जानपाटलाचापाडा) येथील लाभार्थी नारायण घागस तसेच शिवळे येथील अशोक इसामे यांच्या सिंचन विहिरींची पाहणी करून आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
टेम्भरे येथील ‘दुर्गा स्वयंसहाय्यता समूहा’कडून चालविण्यात येणाऱ्या खाकरा उत्पादन उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. या समूहाला यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे व बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ‘जनमन’ योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तालुक्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकासकामांचीही पाहणी करण्यात आली.

  • कान्होळ येथे ३०५४ लेखाशीर्षांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम
  • आंबेळे बुद्रुक येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बांधकाम
  • संगम येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे
  • शिरवली (मा.) येथे जनसुविधा योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे
    या सर्व कामांची गुणवत्ता, गती आणि नियोजन याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.

संपूर्ण दौऱ्यात विकासकामांचा वेग, योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. स्थानिक पातळीवर लोकसहभाग वाढवून शाश्वत विकास साधण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

यावेळी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, उप अभियंता बांधकाम जडे, उपअभियंता पाणीपुरवठा जगदीश बनकरी, गटशिक्षणाधिकारी मधुकर गोरड, सर्व विभागाचे विस्तार अधिकारी, संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सीआरपी, स्वयंसहाय्यता समूहाचे सदस्य तसेच पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *