
पंचायत समिती अंबरनाथ येथे आढावा बैठक व विकास कामांची पाहणी ; ग्रामपंचायत रहाटोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची भेट
ठाणे, दि. २६ :- दिनांक २६ मार्च रोजी जिल्हा परिषद ठाणे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव (भा. प्र. से.) यांनी तालुका अंबरनाथ येथील ग्रामपंचायत रहाटोली येथे भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

या भेटीदरम्यान गावातील पायाभूत सुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा योजना, घरकुल (आवास) योजना, महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, रस्ते विकास कामे तसेच इतर प्रगतिपथावरील उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित कामांची गुणवत्ता, वेळेत पूर्णता आणि नागरिकांना मिळणारे प्रत्यक्ष लाभ याबाबत समाधान व्यक्त करत काही कामांमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक त्या सूचना ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी ग्रामविकास अधिक प्रभावी करण्यासाठी पारदर्शकता, जनसहभाग आणि योजनांची परिणामकारक अंमलबजावणी यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांचे कौतुक करत भविष्यातही अशाच पद्धतीने विकासात्मक उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

या पाहणीवेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ अजित देसाई, ग्रामपंचायत सरपंच तथा प्रशासक राजश्री रुपेश रेवाळे, ग्रामपंचायत अधिकारी दिनेश गणपत वारघडे, जिल्हा परिषद शाळा रहाटोलीचे मुख्याध्यापक शिरसाठ, अंगणवाडी सेविका, महिला बचतगट प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती अंबरनाथ येथे भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या आढावा बैठकीत आरोग्य, पशुसंवर्धन, बांधकाम, घरकुल योजना, मनरेगा, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, अर्थ, उमेद, कृषी व सामान्य प्रशासन या विभागांतील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

आरोग्य विभागांतर्गत आरोग्यविषयक सेवा, पशुसंवर्धन विभागांतर्गत इमारती व श्वान प्रतिबंधक योजना, बांधकाम विभागांतर्गत नागरी व जनसुविधा, घरकुल योजनांतर्गत प्रधानमंत्री आवास व जनमन आवास योजना, मनरेगा अंतर्गत कामांची स्थिती, ग्रामीण पाणीपुरवठा व जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, शिक्षण विभागातील शाळांची स्थिती व रिक्त पदे, तसेच कृषी व बचतगटांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला.

तसेच पंचायत समिती कार्यालयाची पाहणी करताना महिला कक्ष, अभिलेख कक्ष, वाहनचालक कक्ष, बायोमेट्रिक हजेरी प्रणाली तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या सभागृहाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

या आढावा बैठकीस गटविकास अधिकारी अजित देसाई, सहाय्यक गटविकास अधिकारी निता खोटरे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विलास फाटक, उपअभियंते संजय सूर्यवंशी व अमित शिंदे, गटशिक्षणाधिकारी विशाल पोतेकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी योगेश येंदे, तालुका आरोग्य अधिकारी अर्चना मोहिते, कृषी अधिकारी प्रज्ञा गवई, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) प्रदीप मोहेकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी दिपक चौगुले, सहाय्यक लेखाधिकारी बालाजी बरकडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एकूणच या दौऱ्याद्वारे ग्रामपातळीवरील विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासन अधिक परिणामकारक व उत्तरदायी बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
- 0
- 0
- 0
- 0




