रायगड

महाराजस्व समाधान शिबिरात विविध शासकीय दाखल्यांचे वाटप; मांगरुळ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराजस्व समाधान शिबिरात विविध शासकीय दाखल्यांचे वाटप; मांगरुळ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रायगड –अलिबाग , जिमाका, दि.१४- राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत कामार्ली महसूल मंडळातील मांगरुळ येथे शिबिराचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार रविंद्र पाटील,प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, बाजार समिती सभापती महादेव मानकर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रघुनाथ (बापू) दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेप्रती असलेल्या प्रेम, जिव्हाळा व कल्याणकारी राज्य व्यवस्थेची प्रेरणा घेऊन राज्य शासनाने हा उपक्रम राबविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या शिबिरांमुळे नागरिकांना महसूल, कृषी, शैक्षणिक तसेच आदिवासी विभागाशी संबंधित विविध दाखले एकाच ठिकाणी तातडीने मिळत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, ‘एक खिडकी योजना’ पद्धतीने सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहिल्याने नागरिकांच्या विविध महसुली कामांचे तातडीने निराकरण होत आहे. या अभियानामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान होण्यास मदत होत असून प्रलंबित प्रकरणांना गती देणे आणि प्रशासन व नागरिक यांच्यात थेट संवाद प्रस्थापित करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

शिबिरात ७/१२ उतारे, फेरफार नोंदी, नामांतरण व वारस नोंद प्रक्रिया, उत्पन्न, अधिवास व जात दाखले, अकृषिक रूपांतरणासाठी सुलभ प्रक्रिया, डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उताऱ्यांची वैधता तसेच तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा आदी सेवांचा समावेश करण्यात आला होता.

कार्यक्रमात विविध शासकीय दाखल्यांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *