
कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे आधुनिक भाजीपाला नर्सरी तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न

नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनवाढ साध्य करण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे दि. २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला नर्सरी प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ . हेडगेवार सेवा समितीचे सचिव डॉ. नितीन पंचभाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा नंदुरबार चे प्रकल्प संचालक दीपक पटेल उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांच्यासह मान्यवरांनी शेतकऱ्यांनी आधुनिक नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून गुणवत्तापूर्ण रोपे तयार करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.

या प्रशिक्षणाचे समन्वयक डॉ. वैभव गुर्वे यांनी नियोजन व अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीमती आरती देशमुख आणि राजेश भावसार यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

तांत्रिक मार्गदर्शनाचा सखोल अभ्यास:
तीन दिवसांच्या प्रशिक्षणात युवा शेतकऱ्यांना प्रो-ट्रे नर्सरी उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान देण्यात आले. योग्य बियाण्यांची निवड, कोकोपीट व इतर माध्यमांची तयारी, ट्रे भरण्याची पद्धत, रोपांची संगोपन तंत्रे, पाणी व पोषण व्यवस्थापन तसेच रोग व कीड नियंत्रण या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कमी खर्चात अधिक दर्जेदार रोपे तयार करण्याच्या पद्धतींचाही ऊहापोह झाला.

तज्ज्ञ व्याख्यानांद्वारे जयंन्त उत्तरवार, पद्माकर कुंदे, डॉ. भूषण बिरारी, डॉ. विनायक फसाके आणि गणेश सदगीर यांनी विषयानुरूप माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

प्रात्यक्षिक पाहणी दौरा:
प्रशिक्षणाचा महत्त्वाचा भाग म्हणून नाशिक येथील Om Gayatri Nursery आणि Sahyadri Farms येथे प्रात्यक्षिक पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. येथे आधुनिक नर्सरी व्यवस्थापन, स्वयंचलित सिंचन प्रणाली आणि उच्च दर्जाची रोपे निर्मिती प्रक्रिया यांचा प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्यांनी घेतला.

उत्साहपूर्ण समारोप:
समारोप सोहळ्यास अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त स्वप्नीलभाई पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी संचालक (फलोत्पादन) डॉ. कैलाश मोते उपस्थित होते.

मान्यवरांनी प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करून उत्पादन व नफ्यात वाढ साधावी, असे आवाहन केले.

या प्रशिक्षणामुळे युवा शेतकऱ्यांच्या ज्ञानात व कौशल्यात लक्षणीय वाढ होऊन गुणवत्तापूर्ण रोपे निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून शेती अधिक लाभदायक करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
collectorofficenandurbar
- 0
- 0
- 0
- 0





