
आधी पुनर्वसन, मगच धरण! बिलाडी धरणाला खामगाव ग्रामस्थांच्या विरोध
बांधकाम त्वरित न थांबवल्यास मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याच्या दिला इशारा
नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो
बिलाडी धरणाला खामगाव ग्रामस्थांनी विरोध दर्शविलेला असून,बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे या मागणीसाठी गावातील ग्रामस्थ बुधवारी गावात मोठ्या प्रमाणावर एकत्र जमा झालेले होते. आधी पुनर्वसन करा मगच धरण बांधा अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आदिवासी विभागामार्फत पुनर्वसनाची मागणी करण्यात आली.धरणाचे काम न थांबवल्यास मुंबईत मंत्रालयावर पायी धडक देण्यात येईल असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला.
बुधवारी खामगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेट्टी यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले, खामगांव गावाचा योग्य असा पुनर्वसनाचा निर्णय न घेताच आता धरणाच्या भूमीपूजनानंतर तब्बल १५ वर्षांनंतर धरणाची उंची थोड्या प्रमाणात कमी करून बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे धरणाचे काम पूर्ण झाल्यावर त्यात साठणाऱ्या पाण्याचा वेढा गावाचा चारही बाजूने राहणार आहे. या थांबणाऱ्या पाण्यामुळे गावात नेहमीच साप, विंचू यांच्यासह वेगवेगळ्या जंगली प्राण्यांचा कायम गावात वावर राहणार असून, हा पाणीसाठा नदीचा पाण्याचा असल्याने डास मच्छराचा वावर वाढून गावात डेंग्यूचे रुग्ण वाढतील तसेच गावालगत असणाऱ्या छोट्या मोठ्या संरक्षण भिंतीमुळे चार महिने गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहण्यासाठी कोठेच जागा नसल्याने गावात कायम दलदल राहिल. शिष्टमंडळात ग्रामपंचायत सदस्य राजेश भील,बापू ठाकरे,भरत मोरे,विष्णू भील,अजय भील,दीपक भील,संजय वळवी,संजय पाटील,अजित भील, विनेश भील,श्रीनाथ भील,भास्कर पाटील,दाजु वसावे, रवींद्र मोरे,सुभाष मोरे,किसान भील,रमेश पाडवी,सागर पाडवी,सनी पाटील यांच्या समावेश होता.
धरणामुळे उद्भवतील साथीचे रोग
ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर असा परिणाम होतच राहिल. हे कोणीच थांबू शकत नाही या नेहमीच्या साथीच्या रोगामुळे धरणाच्या पाण्याजवळ मानवी वस्ती राहुच शकत नाही. तरी हा आमच्या गावाच्या आरोग्याचा धोका धरणाजवळ बांधण्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या संरक्षण भिंतीमुळे थांबू शकत नाही. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाने रचला कट
बिलाडी धरणाचा धोका असून, देखील ग्रामस्थांविरुद्ध प्रशासन कटकारस्थान रचत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. धरणामुळे नेहमीचा साथीच्या रोगांना वैतागुन त्यांच्या संपत्तीचा कोणताही मोबदला न घेता ते आपली घरे दारे सोडुन जावीत व संपूर्ण गाव कोणताही मोबदला न देता खाली केले जाईल. यासाठीच जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाने हे षडयंत्र अत्यंत हुशारीने व थंड डोक्याने जाणीवपुर्वक खामगांव ग्रामस्थाविरुध्द रचले आहे.
चौकट
खामगाव हे पेसाअंतर्गत येत असल्याने खास बाब म्हणुन राज्याच्या आदिवासी विभागामार्फत पुनवर्सन करण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने राज्याचा आदिवासी विभागाकडे करावी. गावाच्या पुनर्वसनाच्या बाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत धरण बांधण्यात येऊ नये.अन्यथा, ग्रामस्थ मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा काढतील.
—— राजेश वसावे
सदस्य, ग्रा.पं खामगाव
फलकांनी वेधले लक्ष
धरणाचा विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी गावात सकाळपासूनच गर्दी केली होती. ग्रामस्थांचे जथ्थे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सकळी ११ वाजता एकत्र जमा झाले. यावेळी वृद्ध महिलांची संख्या सर्वाधिक होती.त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हातात मागण्यांचे फलक झळकवले. ‘तुमचे धरण,आमचे आरोग्य… आधी पुनर्वसन मगच धरण’, ‘नवापूर रस्त्यावर दिलेल्या शासकीय जागेवरच गावाचे पुनर्वसन करावे’ अशा घोषणांचे लोकांनी लक्ष वेधले.
- 0
- 0
- 0
- 0





