
शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे यंदाही इको फ्रेंडली होळी…
नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो
केवळ झाडे लावा, झाडे जगवा अशी घोषणा न देता खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाने आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सन 1990 पासून पारंपारिक होलिकादहनाच्या प्रथेचे यंदा 36 वे वर्ष आहे.
होळीला लाकूड तोडून तसेच झाडांना हानी पोहोचवून होलिका साजरी करण्या ऐवजी महिलांच्या उपस्थितीत वृक्ष पूजन (रोप) तसेच नारळ पूजन करण्यात येते. यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येतो.निसर्ग सौंदर्या बरोबरच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे दरवर्षी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात येते. यात कुठलेही लाकूड न जाळता केवळ शेणाच्या गोवऱ्या, जुनी, नवी कपडे तसेच टाकाऊ वस्तूंचा वापर करून होळी साजरी करण्यात येते. नंदुरबार जिल्ह्यातील वाढते तापमान तसेच जंगल तोडीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे. ऐतिहासिक बालाजी वाडा येथील मुख्य होळी प्रज्वलित झाल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते मशालीद्वारे बालवीर चौकातील होळी प्रज्वलित करतात.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी सांगितले की, नंदुरबार येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाने सन 1990 पासून पर्यावरणाचा संदेश देणारी आगळी वेगळी होळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. नंदुरबार जिल्ह्यात होळीच्या दिवशी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात. यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून जंगल नष्ट होत चालले आहे. भविष्यात विकराळ परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मंडळातर्फे दरवर्षी इको फ्रेंडली होळी साजरी करण्यात येते.
होळीसह रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा तसेच रासायनिक रंगांचा वापर टाळण्यात येतो. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आदर्श होळी साजरी करण्याचा मान शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाने राखून ठेवला आहे.नंदुरबार मधील शहिद शिरीषकुमार मित्र मंडळ हे दरवर्षी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी इको-फ्रेंडली (पर्यावरणपूरक) होळी साजरी करण्यावर भर देतात.
या मंडळाच्या इको-फ्रेंडली होळीची प्रमुख वैशिष्ट्ये :
गोवरीची होळी: पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी लाकडां ऐवजी गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांचा वापर केला जातो.
नैसर्गिक रंग: रासायनिक रंगांमुळे होणारे त्वचेचे विकार आणि पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांपासून बनवलेल्या रंगांचा वापर करण्याचे आवाहन केले जाते.
पाणी बचत: कोरडी होळी खेळून पाण्याची नासाडी टाळण्यावर या मंडळाचा विशेष भर असतो. होळीच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट प्रथा दूर करणे आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यापूर्वी मंडळाच्या पर्यावरण पूरक होळीला निसर्ग समितीतर्फे जिल्हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्हा हा त्याच्या पारंपारिक आणि आदिवासी संस्कृतीमधील होळीसाठी प्रसिद्ध आहे, जिथे सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिरीषकुमार मित्र मंडळासारख्या संस्था या परंपरेला आधुनिक आणि पर्यावरणाभिमुख वळण देण्याचे कार्य करत आहेत.
होलिकोत्सव यशस्वीतेसाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे,
ज्येष्ठ सल्लागार निवृत्त शिक्षक जी. एस. गवळी,कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, सदस्य बी.डी. गोसावी, अशोक यादबोले,
काशिनाथ गवळी, गोपाल हिरणवाळे, विशाल हिरणवाळे, धीरेन हिरणवाळे
आदी प्रयत्न करीत असतात.
संग्रहित छायाचित्र नंदुरबार येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे करण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक होळीचे संग्रहित छायाचित्र.
- 0
- 0
- 0
- 0





