नंदुरबार

जि. प. शाळा, मौलीपाडा येथे ‘अभ्यास गट’ उपक्रमातून गुणवत्ता वृद्धीकडे वाटचाल

जि. प. शाळा, मौलीपाडा येथे ‘अभ्यास गट’ उपक्रमातून गुणवत्ता वृद्धीकडे वाटचाल

नवापूर / सप्त नगरी न्युज

नवापूर तालुक्यातील जि. प. शाळा, मौलीपाडा ही शाळा पर्यावरणपूरक वृक्षसंवर्धन, स्वच्छ, सुंदर व सुरक्षित परिसरामुळे आदर्श शालेय वातावरण निर्माण करणारी शाळा म्हणून ओळखली जाते. हिरवळ, विविध प्रकारच्या वृक्षांचे उत्तम संवर्धन आणि शिस्तबद्ध परिसरामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जात असून, त्यामधील ‘विद्यार्थी अभ्यास गट’ हा एक अत्यंत परिणामकारक उपक्रम ठरत आहे.

हा अभ्यास गट उपक्रम शाळा भरण्यापूर्वीच्या वेळेत शाळेच्या प्रांगणात राबविला जातो. शाळेतीलच स्वेच्छेने इच्छुक, प्रगत व समजदार विद्यार्थ्यांची गटप्रमुख म्हणून निवड करण्यात येते. हे गटप्रमुख इतर विद्यार्थ्यांना अभ्यासात मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार गट तयार केले जात असून, प्रत्येक विद्यार्थी आपल्या पसंतीच्या गटप्रमुखाकडे अभ्यासासाठी बसतो.

अभ्यास गटांसाठी फळा, खडू तसेच आवश्यक लेखन-वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते. तसेच उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी शिक्षकांकडून स्पष्ट सूचना व मार्गदर्शन दिले जाते.

या अभ्यास गटांमुळे विशेषतः अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन व संख्या ज्ञान दृढ होण्यास मोठी मदत होत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच्या वेळेचा योग्य उपयोग होत असून विद्यार्थी परिपाठासाठी वेळेत शाळेत उपस्थित राहू लागले आहेत. स्वेच्छेने निवडलेले गटप्रमुख असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समन्वय, आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित होत आहेत.

अभ्यास गट उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होत असून, वाचन प्रेरणा दिवसासारख्या उपक्रमांना देखील या माध्यमातून चालना मिळत आहे. जि. प. शाळा, मौलीपाडा येथील हा उपक्रम इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *