नंदुरबार

आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगा, भाषाचे संगोपन करणे गरज – प्राचार्या डॉ. माहेश्वरी गावित

आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगा, भाषाचे संगोपन करणे गरज – प्राचार्या डॉ. माहेश्वरी गावित

तळोदा वरिष्ठ महाविद्यालयात बोलींचा जागर हा कार्यक्रम

तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो

भाषेचे संवर्धन, जतन हे महिलांनी मोठ्या प्रमाणात केले आहे. मावची बोली ही नवापूर, साक्री, दहिवेल भागात मोठ्या प्रमाणात बोलली जाते. आदिवासी समाजातील लोकगीते मावची भाषेत देखील आहेत. जेवढी बोली बोलणार, तेवढी भाषा जिवंत राहील. आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगा, भाषा ही आपल्या अस्मितेचा भाग आहे. बोली भाषा टिकण्यासाठी भाषेचे दस्तऐवज, संगोपन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. माहेश्वरी गावित यांनी केले.

                     मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्याच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा राबविण्यात येत असून त्यानुसार येथील वरिष्ठ महाविद्यालयात बोलींचा जागर हा कार्यक्रम बुधवारी (ता. २१) आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या.
                     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हेमंत दलाल होते. बोली भाषा तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. पुष्पा गावित (देहवाली बोली), प्राचार्या डॉ. माहेश्वरी गावित (मावची बोली), प्रा. बन्सीलाल भामरे (पावरा बोली) उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भाषा संचालनालयाचे सहाय्यक संचालक ह. म. सूर्यवंशी, पर्यवेक्षक संदीप साबळे, अनुवादक नामदेव कोळी, आस्थापना सहाय्यक रुपेश मोरे, कॉलचे ट्रस्टचे उपाध्यक्ष रोहित माळी, संचालक उखा पिंपरे आदी उपस्थित होते. प्रतिमापूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

                         यावेळी प्रा. पुष्पा गावित यांनी सांगितले की, भिल्ल बोली भाषा म्हणजेच देहवाली भाषा होय. देहवाली भाषेत अनेक शब्द राजस्थान, गुजरात राज्यातून आले आहेत. आपले साहित्य तेव्हाच समृद्ध होईल जेव्हा बोली भाषा टिकून राहतील असे सांगून त्यांनी ‘शिबली’ यावर कविता सादर केली. आणि ‘शिबली’ आदिवासी समाजात कोणकोणत्या कामात येते व किती महत्वपूर्ण याबद्दल माहिती दिली. प्रा. बन्सीलाल भामरे यांनी सांगितले की, पावरा समाज हा फक्त पावगड पर्यंत मर्यादित नसून पावरा समाजाचा इतिहास फार विस्तृत आहे. पावरी बोली भाषेत गुजराती, राजस्थानी, नेमाडी भाषेचे शब्द जास्त प्रमाणात दिसतात. अनेक भाषांमधून पावरी भाषा विकसित झाली आहे. तसेच पावरी भाषेत अनेक म्हणी, वाकप्रचार आहेत असे सांगून त्यांनी पावरी भाषेत म्हणी बोलून दाखवले.

                               यावेळी पाहुण्यांचा परिचय प्रा. हेमंत चौधरी यांनी केला. प्रा. उषा पावरा यांनी स्थानिक पावरी भाषेत प्रास्ताविक केले. प्रा. ज्योत्स्ना पिंपरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. उसा वळवी यांनी आभार मानले.


ग्रंथदिंडी, शोभायात्रा –
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथदिंडी, शोभायात्रा काढण्यात आली. दिंडी स्मारक चौक मार्गाने परत महाविद्यालयात पोहचली. शोभायात्रेत पारंपरिक लोकनृत्य, लोकसंगीत, लोकगायक पथकांचा समावेश होता. ढोल आणि पारंपारिक वाद्यसंगीतासह नृत्याविष्कार करत निघालेली शोभायात्रा लोकांचे आकर्षण ठरली.


सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रस्तुती –
महाविद्यालयाच्या खुल्या मंचावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी नंदुरबार तालुक्यातील वडझाकण येथील रोहिदास कोकणी व संघाने आकर्षक असे डोंगर्‍या देव नृत्य सादर केले. साक्री तालुक्यातील धवळीविहीर येथील शत्रुघ्न अहिरे व संघाने पंचरंगी बोली-भाषेत गायन आणि संगीत प्रस्तुत केले. तळोदा तालुक्यातील नर्मदानगर येथील रोहन गावित व त्यांच्या ग्रुपने आधुनिक वाद्य संगीतासह आदिवासी बोली-भाषेतील गीतांचे सादरीकरण केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थींनी, प्राध्यापक वृंद यांनीही आदिवासी गीतांवर नृत्य करत आनंद लुटला.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *