
नंदुरबार जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम: सेवावृत्तीच्या दिवशीच सेवालाभाचे आदेश सन्मानपुर्वक वितरीत!

नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतून जानेवारी २०२६ पासून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत कौतुकास्पद आणि संवेदनशील उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ सन्मानपूर्वक सुपूर्द केले जातात. याच यशस्वी उपक्रमांतर्गत दि. ३० जून २०२६ रोजी सेवा निवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान व सत्कार सोहळा दि.30 जुन 2026 रोजी जिल्हा परिषदेच्या ‘याहामोगी सभागृहात’ अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात पार पडला. सदर कार्यक्रमाचे सहावे पुष्प आज गुंफण्यात आले.

प्रशासकीय संवेदनशीलतेचा ‘नंदुरबार पॅटर्न’: सेवानिवृत्तीच्या दिवशीच सेवा निवृत्ती लाभाचे आदेश आणि यथोचित सन्मान!

शासकीय सेवेतून निवृत्त होणारा कर्मचारी ज्या दिवशी आपली खुर्ची सोडतो, नेमकी त्याच दिवसापासून त्याच्या मनात भविष्यातील आर्थिक लाभांची आणि पेन्शनची चिंता सुरू होते. पेन्शन, पीएफ आणि इतर लाभांच्या फाईल्स मंजूर करून घेण्यासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवणे हे आजवर अनेकदा क्लेशदायक ठरले आहे. मात्र, नंदुरबार जिल्हा परिषदेने या परंपरेला छेद देत संपूर्ण राज्यासमोर प्रशासकीय संवेदनशीलतेचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. नमन गोयल यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘सेवानिवृत्तीच्या दिवशीच लाभ आणि सन्मान’ या उपक्रमाचे सहावे पुष्प दि. 30 जून २०२६ रोजी अत्यंत भावूक आणि उत्साही वातावरणात गुंफण्यात आले.

प्रशासनाचा ‘कर्तव्य’ भाव आणि संवेदनशीलता !
जिल्हा परिषद नंदुरबार येथील याहामोगी सभागृहात आयोजित या सोहळ्यात माहे 30 जुन २०२६ रोजी सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. नमन गोयल (भाप्रसे) यांच्या हस्ते कुटुंबासह सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासनाचा मुख्य हेतू स्पष्ट केला.

“कर्मचारी आपल्या आयुष्यातील ३० ते ३५ वर्षे प्रशासनाला आणि जनतेला सेवा देतात. अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच सर्व हक्काचे लाभ देऊन सन्मानपूर्वक निरोप देणे, हे प्रशासनाचे केवळ काम नसून ते आमचे ‘कर्तव्य’ आहे.”
— श्री. नमन गोयल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नंदुरबार)
काय आहे हा नाविन्यपूर्ण ‘नंदुरबार पॅटर्न’?
हा उपक्रम केवळ एक कौतुकाचा सोहळा नसून, शासकीय दप्तरदिरंगाईला पूर्णविराम देणारी एक क्रांती आहे. याची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

- तात्काळ आर्थिक दिलासा: सेवानिवृत्तीच्या दिवशीच पीएफ (PF), ग्रॅच्युइटी आणि इतर सर्व देय लाभांचे आदेश थेट कर्मचाऱ्यांच्या हातात सुपूर्द केले जातात.
- दप्तरदिरंगाईला पूर्णविराम: निवृत्तीनंतर कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची कर्मचाऱ्यांची वयोवृद्ध वयातील कसरत आता पूर्णपणे थांबली आहे.
- संस्कार आणि सन्मान: केवळ सेवा लाभाचे आदेशच नव्हे, तर कर्मचाऱ्यांना शाल, स्मृतीचिन्ह आणि ‘श्यामची आई’ हे संस्कारक्षम पुस्तक देऊन त्यांचा यथोचित गौरव केला जातो.
सत्कारमूर्तींच्या डोळ्यांत आनंदाश्रू!
हा सोहळा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता एक कौटुंबिक सोहळा बनला असुन उपस्थित सन्मानार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भावना अनावर झाल्या. “आजच्या या सन्मानाने आणि सेवा निवृत्तीच्या दिवशीच मिळालेल्या आर्थिक सुरक्षेने आम्ही भारावून गेलो आहोत,” अशा शब्दांत त्यांनी भावूक होऊन प्रशासनाचे आभार मानले.
या सोहळ्याला शिक्षणाधिकारी श्री. भानुदास रोकडे, उप शिक्षणाधिकारी, श्री निलेश लोहकरे, कार्यकारी अभियंता, श्री अजय पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, संघटनांचे पदाधिकारी आणि सेवा निवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, आत्पेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा परिषदेचा हा उपक्रम प्रशासकीय पारदर्शकता, गतिमानता आणि कर्मचाऱ्यांप्रती असलेली आत्मीयता याचे जिवंत उदाहरण आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांनीही हा पॅटर्न राबवल्यास कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन खऱ्या अर्थाने सुसह्य होईल.
- 0
- 0
- 0
- 0





