नाशिक

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला कावनईच्या कातकरी बांधवांशी संवाद

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला कावनईच्या कातकरी बांधवांशी संवाद

नाशिक, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) : दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पारावर बसून वृद्ध दांपत्याचा जमिनीचा विषय मार्गी लावल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आज थेट इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे कातकरी वस्तीवर पोहोचले. तेथे त्यांनी कातकरी बांधवांशी संवाद साधत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा घेत कावनई येथील सर्व पात्र मतदार आणि ग्रामस्थांनी या मोहिमेत घरोघरी येणाऱ्या मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) सहकार्य करावे, असे आवाहनही केले.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी बीएलओ यांच्यासमवेत कातकरी वस्तीवरील घरोघरी भेट दिली. त्यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दुर्गम व वंचित समाजघटकांतील एकही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध असून मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे विशेषतः दुर्गम व वंचित भागातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आपले गणना प्रपत्र भरून संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे वेळेत जमा करावे.

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण हा कालबद्ध कार्यक्रम असल्याने सर्व पात्र मतदारांनी वेळेत सहकार्य करून मतदार यादी अद्ययावत करण्यास हातभार लावावा, असे त्यांनी आवाहन केले. तसेच जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी कातकरी वस्तीवरील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे सहकार्य करण्यात येईल, असेही सांगितले.

यावेळी इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर, मंडळ अधिकारी प्रशांत गोसावी, ग्राम महसूल अधिकारी जयंत धोडपकर तसेच बीएलओ संतोष शिरसाट, स्वाती शिरसाट आदी उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *