जिल्हा वार्षिक विकास आराखड्यातील दोन महत्त्वाच्या प्रयोगशाळांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

नंदुरबार, / सप्त नगरी न्युज ब्युरो:
जिल्हा वार्षिक विकास आराखड्यांतर्गत उभारण्यात आलेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांची मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज, ०१ जानेवारी २०२६ रोजी सविस्तर पाहणी केली. या पाहणीत व्हिजन माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा तसेच अन्नवेध अन्न तपासणी प्रयोगशाळा या दोन्ही प्रकल्पांचा समावेश होता.

व्हिजन माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, नंदुरबार (सन २०२४-२५) येथे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रयोगशाळेत भेट देऊन मातीतील १२ महत्त्वाच्या घटकांची तपासणी कशी केली जाते, याची सविस्तर माहिती घेतली. या प्रयोगशाळेमुळे शेतकऱ्यांना माती व पाण्याच्या गुणवत्तेची अचूक माहिती मिळून पीक व्यवस्थापन अधिक वैज्ञानिक पद्धतीने करता येणार आहे.

तसेच अन्नवेध अन्न तपासणी प्रयोगशाळा, नंदुरबार (सन २०२५-२६) ची पाहणी करताना अन्नसुरक्षेच्या दृष्टीने या प्रयोगशाळेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. जिल्ह्यातच अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याने, अन्न नमुन्यांची तपासणी आता अधिक सुलभ, जलद आणि प्रभावी होणार आहे.

दोन्ही प्रयोगशाळांमध्ये कोणकोणते घटक तपासले जातात, त्यासाठी वापरण्यात येणारी आधुनिक उपकरणे व तांत्रिक प्रक्रिया यांची सविस्तर माहिती मा. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. माती, पाणी आणि अन्न परीक्षणासाठी जिल्ह्याला यापूर्वी भासणाऱ्या अडचणी या प्रयोगशाळांमुळे दूर होणार असल्याबाबत त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले.
या पाहणी दौऱ्यावेळी मा. श्री. तानाजी खर्डे (कृषी उपसंचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार), मा. श्री. सी. के. ठाकरे (उपविभागीय कृषी अधिकारी, नंदुरबार), श्री. व्ही. एस. वळवी (प्रभारी तालुका कृषी अधिकारी, नंदुरबार), श्री. कुणाल ठाकूर (मंडळ कृषी अधिकारी, कोरीट) तसेच श्री. सतीश गिरासे (उप कृषी अधिकारी, नंदुरबार) उपस्थित होते.
या दोन्ही प्रयोगशाळांमुळे नंदुरबार जिल्ह्यात कृषी गुणवत्ता, अन्नसुरक्षा आणि शाश्वत विकास या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले असून, शेतकरी व नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.
(Collector Office Nandurbar)
DistrictDevelopment #VisionLab #FoodSafety #SoilTesting #WaterTesting #FoodTestingLab #AgricultureDevelopment
- 0
- 0
- 0
- 0





