
नंदुरबार / सप्त नगरी न्युज
शिक्षकांच्या कौशल्यविकासासाठी आयोजित कथाकथन स्पर्धेत नंदुरबारच्या मुख्याध्यापिका सौ मिनाक्षी भदाणे यांनी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून घवघवीत यश संपादन केले आहे.
राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शैक्षणिक व प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा मुख्य हेतू समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे तसेच डिजिटल, भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देणे हा होता.
या स्पर्धांमध्ये नंदुरबार येथील स्वातंत्र्य सैनिक श्री गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्या मंदिर येथील मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी पंकज भदाणे यांनी कथाकथन या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या सादरीकरणातील आशयपूर्ण मांडणी, प्रभावी भाषाशैली आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे परीक्षकांनी त्यांचे विशेष कौतुक केले. या यशामुळे त्यांची नाशिक विभागस्तरावर कथाकथन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ॲड. रमणभाई शहा, सचिव डॉ. योगेशभाई देसाई, प्राचार्या सुषमा शाह, मनीषभाई शाह तसेच डायट प्राचार्य रमेश चौधरी, विनोद लांवडे (अधिव्याख्याता) आणि अधिव्याख्याता पवार साहेब जिजामाता कॉलेज प्राचार्य संजय शिंदे यांनी सौ. भदाणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात गौरवाची भर पडली असून इतर शिक्षकांनाही अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
- 0
- 0
- 0
- 0





